उस्मानाबाद झेडपीत खडाजंगी, आमदारांचे नातेवाईक भिडले !

उस्मानाबाद झेडपीत खडाजंगी, आमदारांचे नातेवाईक भिडले !

उस्मानाबाद – जिल्हा परिषदेत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील या उपाध्यक्ष आहेत. तर औसाचे काँग्रेसचे आमदार बसवराजपाटील यांचे चिरंजीव शरण पाटील जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते आहेत. सोमवारी (ता. 4) झालेल्या सर्वसाधारण सभेत बराच गोंधळ झाला. उपाध्यक्षांच्या दालनाच्या दुरुस्तीसाठी 27 लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. हाच मुद्दा उपस्थित करीत काँग्रेसचे शरण पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. जिल्ह्यातील अनेक शाळा धोकादायक असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. अनेक विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत. तरीही उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती स्वतःच्या दालनासाठी 27 लाख रुपयांचा निधी खर्च करत असल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. त्यावर उपाध्यक्ष सौ. पाटील यांनीही यावर जोरदार आक्षेप नोंदविला.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसची सत्ता होती आणि अध्यक्षही काँग्रेसचेच होते. त्यावेळी त्यांच्या दालनाच्या दुरस्तीसाठी 25 लाख रुपये खर्च करण्यात आले. त्याचे टेंडर न काढता त्याचे छोटे छोटे तुकटे करुन निधीचा खर्च आपल्या सोईप्रमाणे केला असाही आरोप अर्चनाताई पाटील यांनी केला. सौ. पाटील यांची राष्ट्रवादीच्या सदस्यांनी जोरदार पाठराखण केली. दोन्ही सदस्यांमध्ये जोरादार खडाजंगी सुरू होती.

विद्यार्थी ज्या पद्धतीने जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत. याकडे प्रामाणिक भावनेने पाहून सभापतीच्या दालनाची दुरुस्ती रद्द करावी, अशी मागणी शरण पाटील यांनी केली. यावर सभापती सौ. पाटील यांनी सभागृहाची दिशाभूल करू नका असे सुनावले. सभागृहात ही बाचाबाची बऱ्याच काळासाठी सुरू होती.

COMMENTS