पुणे – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. उलट त्या वाढतच आहेत. भोसरी येथील जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी खडसे यांच्या विरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. न्यायालयाच्या आदेशानुसार एसीबीने ही कारवाई केली आहे. भोसरी येथील जमिन गैरव्यवहार प्रकरणाची अप्पर पोलिस महासंचालकाच्या देखरेखीखाली चौकशी करा असा आदेश उच्च न्यायालयाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला दि. ८ मार्च २०१७ रोजी दिला होता. त्यानुसार एसीबीने काल बंडगार्डन पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम १३ (१) ड, (२), १५ आणि भादंवि १०९ प्रमाणे एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी, जावई, आणि इतर अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. गावंडे यांनी ३० मे २०१६ रोजी बंडगार्डन पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जालाच फिर्यादी समजावी आणि प्रकरणाचा तपास करावा असा आदेश आहे. हायकोर्टात या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. त्याच्या आधी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार एसीबीनं ही कारवाई केली आहे. या तपासाशी निवृत्त न्यायमूर्ती दिनकर झोटिंग यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून करण्यात येणाऱ्या चौकशीचा काहीही संबंध नसून हा तपास स्वतंत्रपणे आणि जलदगतीने करण्याचे स्पष्ट केले होते.
COMMENTS