दरड कोसळून उत्तराखंडमध्ये झालेल्या दुर्घटनेत सुमारे 15 हजार भावीक अडकले आहे. यात महाराष्ट्रातील भावीकांचाही समावेश आहे. मात्र, यापैकी 102 भाविक सुखरूप असून आम्ही त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती राज्याचे माहिती, मदत आणि पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
विष्णूप्रयाग परिसरातील हाथी पर्वत भागात भूस्खलन झाल्याने ही दुर्घटना घडली. ही दुर्घटना चामोली जिल्ह्यातील जोशीमठ भागापासून 9 किलोमीटर अंतरावर घडली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्रातून उत्तराखंडमध्ये तिर्थयात्रेसाठी अनेक भाविक गेले आहेत. त्यापैकी औरंगाबादमधून गेलेले सुमारे 102 भाविक या दुर्घटनेत अडकले. हे सर्व भाविक सुखरूप असून, आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सर्वांना सुखरूप ठिकाणी पोहोचवले असून, सर्व भाविकांना लवकरच राज्यात परत आणले जाईल, असे पाटील यांनी म्हटले आहे.
दरड कोसळल्यामुळे बद्रीनाथचा रस्ता बंद झाला आहे. तो पुन्हा सुरु करण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, या दुर्घटनेत लातूरमधीलही काही नागरिक अडकल्याची माहती आहे. त्यामुळे अशा भाविकांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधावा असे अवाहन लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. तसेच, अधिक माहिती घेण्यासाठी किंवा देण्यासाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास माहिती देण्यात यावी यासाठी 02382 220204/टोल फ्री 1077 , या नंबरवर संपर्क साधावा, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. उस्मानाबादच्याही जिल्हाधिकाऱ्यांनी असेच अवाहन केले असून, उत्तराखंडमधील दुर्घटनेत अडकलेल्या पीडित भाविकांसंबधी माहिती देण्यासाठी किंवा घेण्यासाठी 02472-225618 / 227301 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.
COMMENTS