कबुतरखान्याच्या मुद्द्यावरुन भाजप – मनसे आमनेसामने

कबुतरखान्याच्या मुद्द्यावरुन भाजप – मनसे आमनेसामने

मुंबई – दादर भागातील कबुतरखाना बंद करण्याची मागणी मनसेने आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली आहे. त्यावर, ऐतिहासिक वारसा आणि भावनात्मक दृष्ट्या हा कबुतरखाना बंद करू नये, अशी भूमिका असलेले पत्र भाजपचे विधानसभेतील प्रतोद राज पुरोहित यांनी आयुक्त मेहता यांना सोमवारी दिले आहे. त्यामुळे आता कबुतरखाना बंद करण्याच्या मुद्द्यावर भाजप – मनसे आमनेसामने आले आहेत. यामुळे मुंबईमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आरोग्यासाठी हा कबुतरखाना घातक असल्याने स्थानिक जनतेला श्वसनाचे विकार होत असल्याचे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. तर पुरोहित यांचे म्हणणे आहे, की आपला देश राम-कृष्ण, महावीर आणि गौतम बुद्धांचा देश आहे. या देशात अहिंसेला अनन्य साधारण महत्व आहे. प्राणीमात्र आणि पशु-पक्षांना अन्नदान देण्याची आपली परंपरा आहे. त्याचबरोबर मुंबईतील भुलेश्वर आणि दादर कबुतरखान्याला ऐतिहासिक वारसा आहे. त्यामुळे हे कबुतरखाने बंद करून जनतेच्या भावना दु:खवू नयेत असे पुरोहित यांनी मेहतांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. त्याचबरोबर जर कबुतरांमुळे श्वसनाचे विकार होत असल्याचे सांगितले जात असले तरी याची पालिकेच्या वरिष्ठ आरोग्य तज्ञांकडून त्याची चौकशी करावी. चौकशी अहवाल आल्याशिवाय या बंदीच्या मागणीवर कोणतीही कारवाई करू नये असे पुरोहित यांनी म्हटले आहे.

त्यामुळे पुरोहित यांच्या या पत्राने मनसे आणि भाजपमध्ये वाद होण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. आता यावर  पालिका आयुक्तांनी कोणती भूमिका घेतली  हे पाहावे लागेल.

COMMENTS