अकोला – छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जांची गावनिहाय पडताळणी दि. 27 व 28 सप्टेंबर 2017 रोजी करण्यात येणार आहे. त्यामध्ये गावागावांत ग्रामपंचातीमध्ये कर्जमाफीसाठी अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांच्या यादयांचे वाचन चावडी वाचनात करण्यात येणार आहे. अर्ज भरताना काही त्रुटी राहील्या असतील किंवा कागदपत्राची कमतरता राहिली असेल अशा शेतकऱ्यांना त्याची पुर्तता करण्याची एक संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चावडी वाचन कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शासनाने ऐतिहासिक कर्जमाफी करुन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या कर्जमाफीमुळे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ होणार आहे. या निर्णयामध्ये अंतर्भूत इतर बाबींमुळे मोठया प्रमाणावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असून हे शेतकरी आता नव्याने कर्ज मिळण्यासाठी पात्र ठरणार आहेत.
कर्जमाफी योजनेतंर्गत दिनांक 22 सप्टेंबर 2017 पर्यंत महा-ई-सेवा केंद्र, सीएससी केंद्र आणि आपले सरकार केंद्रांच्या माध्यमातून अकोला जिल्हयातील थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यात आले आहे. मुदतीपर्यंत जिल्हयात 2 लाख 48 हजार 429 शेतकऱ्यांच्या अर्जांची नोंदणी करण्यात आली असून 1 लाख 38 हजार 962 शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यात आले आहेत.
दि. 27 व 28 सप्टेंबर 2017 रोजी होणाऱ्या चावडी वाचनात कर्जमाफीसाठी पात्र व अपात्र ठरणारे शेतकरी यांच्या वाचनासह ऑनलाईन अर्ज भरताना काही त्रुटी राहील्या असतील किंवा कागदपत्राची कमतरता असेल अशा शेतकऱ्यांना त्याची पुर्तता करण्याची एक संधी उपलब्ध होणार आहे.
कर्जमाफीसाठी अपात्र दर्शवण्यात आलेले शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असल्याचा पुरावा सादर करु शकतील. कर्जमाफी योजनेपासून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी चावडी वाचन करुन त्रुटयांचे निरासन करण्यात येणार आहे, याचा लाभ शेतकऱ्यांनी अवश्य घ्यावा, त्यासाठी चावडी वाचनास उपस्थित राहावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले आहे.
COMMENTS