कर्जमाफी निकषाची बैठक  का फिस्कटली,  कर्जमाफीचं पुढे काय ?

कर्जमाफी निकषाची बैठक  का फिस्कटली, कर्जमाफीचं पुढे काय ?

सरकारकडून गेल्या चार पाच दिवसांपासून येत असलेली वक्तव्य आणि शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांनी सोमवारी सकाळी केलेलं वक्तव्य यावरुन कर्जपाफीसाठी सोमवारी सांयकाळी 4 वाजता होणारी बैठक वादळी होणार हे नक्की होतं. आणि झालंही तसंच. दोन्ही बाजु आपआपल्या मुद्यावर ठाम राहिल्याने बैठकी काहीही तोडगा निघू शकला नाही. सरकारने शेतक-यांना 10 हजार रुपये मदतीची जी घोषणा केली आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जाचक अटी  लादल्या असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला. त्या अटी रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. मात्र सरकार त्या अटी मागे घेण्यास तयार नाही. या अटींमध्ये पेन्शनधारकांनाही कर्जमाफीतून वगळण्याची अट आहे. या अटीवर बैठकीत चांगलाच वाद झाला. अनेक पेन्शनधारकांना केवळ 2 हजार किंवा त्यापेक्षा थोडे जास्त पेन्शन मिळते त्यांना कर्जमाफीच्या निकषात बसवा अशी शेतकरी नेत्यांची मागणी होती. सरकारने ती फेटाळून लावली. चारचाकी वाहने ज्याच्या घरी आहेत त्यांनाही कर्जमाफी मिळणार नाही ही अशी अट सरकारने घातली आहे. ती अट काढून  टाकावी अशी राजू शेट्टी यांची मागणी होती. आपल्याकडे एक शेतकरी आला होता त्याने 22 हजार रुपयांची जुनी मारुती कार घेतली. त्यालाही कर्जमाफीतून वगळणार का असा सवाल राजु शेट्टी यांनी केला. गरजेपोटी अशा साध्या आणि कमी किमतीच्या गाड्या ज्यांच्याकडे आहेत, त्यांना कर्जमाफीतून वगळू नका अशी शेतकरी नेत्यांची मागणी आहे. मात्र सरकार ती मान्य करायला तयार नाही. केवळ एक लाखांपर्यंतच कर्जमाफ करण्यास सरकार तयार आहे. त्यालाही शेतकरी नेत्यांचा आक्षेप आहे. दाक्ष बागायतदारांना दीड लाखांपर्यंत पीककर्ज मिळतं.  त्यामुळे एक लाख रुपयांची मर्यादा वाढवा अशी शेतक-यांची मागणी आहे. मात्र सरकार 1 लाख रुपयांवर ठाम आहे. या मुद्यांवरुन शेतकरी नेते आणि सरकारमध्ये तीव्र मतभेद झाले, आणि एकीकडे सरकारची पत्रकार परिषद सुरु असताना दुसरीकडे शेतकरी नेते 10 हजार मदतीच्या सरकारच्या जीआरची होळी करत होते, जीआर फाडत घोषणाबाजी करत बैठकीतून बाहेर पडले.

सरककारने ठरवलेल्या निकषामध्ये 80 टक्के शेतक-यांचं कर्ज माफ होत असल्याचा दावा महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केला आहे. मात्र शेतकरी नेत्यांना सरकारचा हा दावा मान्य नाही. बैठकीनंतर शेतकरी नेत्यांनी केलेली सरकारच्या जीआरची होळी आणि घोषणाबाजी यामुळे चंद्रकांत दादा पाटील चांगलेच संतापले होते. चर्चेसाठी आलेल्या काही तथाकथीत शेतकरी नेत्यांना कर्जमाफी होऊ द्यायी नाही, त्यामुळेच ते असा गोंधळ घालत असल्याचा आरोप चंद्रकांत दादा पाटील यांनी केला आहे. अशा आडमुठ्या नेत्यांना ख-या शेतक-यांनी खड्यासारखं बाजुला करायला पाहिजे असंही चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामळे आधीच भडकलले शेतकरी नेते आणखीनच आक्रमक होण्याची शक्यता आहे. थोडक्यात कर्जमाफीच्या निकषावर सर्वसहमती होणे अवघड दिसत आहे. शेतकरी नेत्यांची अशीच भूमिका राहिली तर सरकार त्यांच्याशी चर्चा न करता एकतर्फी कर्जमाफी जाहीर करेल असा इशाराही चंद्रकांत दादा पाटील यांनी दिला आहे. एकंदरीत दोन्ही बाजु आपआपल्या मतावर ठाम राहिल्यामुळे आता सरकार एकतर्फी कर्जमाफी जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामळे पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन सुरू होण्याची शक्यता आहे.

COMMENTS