कशाला हवी आहे बुलेट ट्रेन ? संतप्त मुंबईकरांचा सवाल !

कशाला हवी आहे बुलेट ट्रेन ? संतप्त मुंबईकरांचा सवाल !

 

प्रत्येक मुंबईकर आज संतापून हाच सवाल विचारत आहे. सोशल मीडियातून तर हा संताप अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. अर्थात बुलेट ट्रेनचे उद्घाटन झालं आणि त्यामुळे ही दुर्घटना झाली असंही कोणीही म्हणणार नाही. मुंबई लोकलच्या समस्यांकडे, त्याच्या सुरक्षेकडे लक्ष द्यायचे सोडून बुलेट ट्रेन कशाला सुरू करत आहात असा त्याचा रास्त सवाल आहे. मुंबईच्या रेल्वेच्या आधुनिकरणासाठी बुलेट ट्रेनचा पैसा खर्च केला तर काही प्रमाणात  का होईना पण त्याचा प्रवास सुसह्य होईल अशी अपेक्षा आहे.

अर्थात मुंबईच्या लोकलच्या दुर्देशेला केवळ सध्याचे मोदी सरकार जबाबदार आहे असं कोणीही म्हणणार नाही. आजपर्य़ंतच्या सर्वच सरकारांनी मुंबईच्या रेल्वेसेवेकडे म्हणावे तसे लक्ष दिले नाही ही वस्तुस्थिती आहे. या सरकारवर जास्त राग येण्याचं कारण म्हणजे हे विद्यमान सरकार आहे आणि सत्ताधा-यांवर संताप व्यक्त होणं हे साहाजिक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या सरकारच्या प्रायॉरटीज. या सरकारला मुंबईतील लोकलचा प्रवास अधिक सुखकर करण्यापेक्षा मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन करण्यात अधिक स्वारस्य आहे.

या सरकारकडे मुंबईतली लोकलच्या सेवेमध्ये सुधारणा करण्यासाठी पैसे नाहीत. जिथे आज चेंगराचेंगरी झाली तिथल्या ब्रिजविषयी शिवसेनेच्या स्थानिक खासदारांनी वारंवार रेल्वेकडे पाठपुरावा केला होता. मात्र पैसा नसल्याचं कारण सांगून त्याच्याकडं दुर्लक्ष केलं गेलं. अर्थात ही दुर्घटना कशामुळे झाली याचं कारण चौकशीत निष्पन्न होईलच. पण निष्पाप मुंबईकरांचे यामुळे जीव गेले हे खरचं आहे.

बुलेट ट्रेनला विरोध असण्याचं कारण नाही. मात्र त्यापेक्षाही सध्या मुंबईच्या लोकलसेवेकडे लक्ष देण्याची, त्याच्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज आहे. त्यामुळे मोदींनी पुन्हा एकदा बुलेट ट्रेनचा फेरविचार करावा अशी समस्त मुंबईकरांची अपेक्षा आहे. बघुयात सरकार काय करतंय ते.

COMMENTS