मुंबई – कीटकनाशकांची फवारणी करताना यवतमाळ जिल्ह्यातील कळंब, घाटंजी, दिग्रस व मारेगाव तालुक्यातील विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्या शेतकरी व शेतमजूर यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांचे अर्थसहाय्य मुख्यमंत्री सहाय्यता निधी निधीतून मंजूर केले असून, यासाठी एकूण 32 लाख रुपये यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री सचिवालयाने कळविले आहे.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार 10 शेतकरी व 6 शेतमजूर यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य मिळण्याचा प्रस्ताव यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आला होता. त्यानुसार सहाय्यता निधीची रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर आज वर्ग करण्यात आली आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या अंतर्गत विमा रक्कम मिळण्यास पात्र प्रकरणातील मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांस गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून अर्थसहाय्य मिळणार आहे. या विमा योजनेचा लाभ मिळणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ दिला जाणार नाही. उर्वरित विमा संरक्षण नसलेल्या व तांत्रिक कारणास्तव विमा संरक्षण पात्र होऊ शकत नसलेल्या प्रकरणांमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य दिले जाणार आहे.
त्यानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून निधी मिळण्यासाठी पात्र प्रकरणांची तपासणी करण्याचे आदेश यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच या 16 व्यक्तींचे प्रस्ताव आल्यानंतरच्या कालावधीत कीटकनाशक विषबाधा प्रकरणी उपचारादरम्यान काही व्यक्तींचे निधन झाले असल्यास त्यांचेही प्रस्ताव तात्काळ पाठवावेत, असेही निर्देश यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहितीदेखील मुख्यमंत्री सचिवालयाने दिली आहे.
COMMENTS