गर्दीच्या ठिकाणी महिलांना धक्के द्याल तर तुरुंगात रवानगी

गर्दीच्या ठिकाणी महिलांना धक्के द्याल तर तुरुंगात रवानगी

आता गर्दीच्या ठिकाणी महिलांना सतत धक्का दिल्यास पुरुषांना चांगलच महागात पडू शकते. महिलांनी यासंबधी तक्रार केल्यास तुमची रवानगी थेट तुरुंगात होऊ शकते. महिलेला वारंवार धक्का म्हणजे गुन्हाच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विशेष पोक्सो न्यायालयाने दिला आहे. 

26 ऑगस्ट 2015 रोजी वडाळा परिसरात राहात असलेल्या दोन अल्पवयीन मुली सायंकाळी शिकवणी आटोपून घरी परतत होत्या. सायंकाळी सातची वेळ असल्याने रस्त्यावरील गर्दीचा फायदा उठवत 24 वर्षीय सद्दाम शेख याने यातील एका मुलीला धक्का दिला. चुकून धक्का लागला असेल म्हणून मुलींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र सद्दामने या मुलींचा पाठलाग करुन दुसर्‍या मुलीला धक्का दिला. पुन्हा मुलींनी दुर्लक्ष केले. सद्दाम हा जाणूनबुजून धक्का देत असल्याने मुलींनी आरडाओरड करण्यास सुरूवात केली. मुलींच्या मदतीला धावलेल्या नागरिकांनी सद्दामला पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपी सद्दाम विरोधात विनयभंगासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्याला बेड्या ठोकल्या. विशेष पोक्सो न्यायालयात चाललेल्या खटल्यामध्ये न्यायमुर्तींनी, गर्दीचा फायदा घेऊन महिला आणि मुलींची छेड काढण्याचा प्रकार नवीन नाही. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तर असे प्रकार अनेकवेळा घडतात. हा एक गंभीर गुन्हाच आहे, असे निरीक्षण नोंदवत आरोपी शेखला एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

 

COMMENTS