पणजी व वाळपई पोटनिवडणुकीसाठी आज (बुधवार) मतदान होत असून सकाळपासूनच मतदानाला सुरवात झाली आहे. या दोन्ही मतदारसंघात सुमारे 51 हजार 32 मतदार आपले नशीब आजमावत आहे. काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असून याचा फटका मतदानाला बसत आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावत येणार आहे.
लोक आधीच गणेशोत्सवाच्या तयारीत गुंतले आहेत. त्यात पावसाची सर पडली आहे. गणेशोत्सव आणि पावसाचा परिणाम सकाळच्या मतदानावर दिसून आला. पणजी आणि वाळपई मतदारसंघात पहिल्या 2 तासात 19% मतदान झाले. पणजी मतदारसंघात 17.67%, तर वाळपई मतदारसंघात 20.24% मतदान झाले. पणजी येथील 8 क्रमांकच्या मतदान केंद्रावर मुख्यमंत्री तथा भाजपचे पणजीतील उमेदवार मनोहर पर्रीकर यांनी मतदान केले. मतमोजणी 28 ऑगस्टला होणार.
पणजी पोटनिवडणुकीत भाजपतर्फे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, काँग्रेसतर्फे गिरीश चोडणकर, गोवा सुरक्षा मंचतर्फे आनंद शिरोडकर व अपक्ष उमेदवार केनेथ सिल्वेरा असे चार उमेदवार रिंगणात आहेत. वाळपईत भाजपतर्फे आरोग्यमंत्री विश्वजित राणे, काँग्रेसतर्फे रॉय नाईक व अपक्ष उमेदवार रोहिदास गावकर असे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
COMMENTS