मोहन भागवत यांच्या वक्तव्यामुळे भाजप अडचणीत, बिहारनंतर आता कर्नाटकात फटका बसणार ?

मोहन भागवत यांच्या वक्तव्यामुळे भाजप अडचणीत, बिहारनंतर आता कर्नाटकात फटका बसणार ?

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणावरुन केलेलं वक्तव्य भाजपला चांगलच महागात पडलं होतं. विरोधी आरजेडी, काँग्रेस आणि जेडीयूने भागवतांच्या वक्तव्याचा प्रचारात पुरेपुर वापर केला होता. त्याचा फटकाही भाजपला बिहार विधानसभा निवडणुकीत बसला होता.
आता तसाच फटका कर्नाटकात बसण्याची शक्यता आहे. लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा द्यावा यासाठी कर्नाटकात सध्या आंदोलन सुरू आहे. मोहन भागवत काही दिवसांपूर्वी कर्नाटकात आले होते. त्यावेळी त्यांनी लिंगायत समाजाने वेगळ्या धर्माचा आग्रह सोडून द्यावा असं आवाहन केलं होतं. त्याविरोधात लिंगायत समाजातून तीव्र भावना व्यक्त होत आहेत. भागवतांनी आम्हाला सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये. आम्ही आमचे वेगळेपण शेकडो वर्षांपासून जपत आहोत. पुरानात रमणा-या भागवतांनी आम्हाला काहीही सल्ला देऊ नये. आम्ही आधुनिकतेची कास धरलेली आहे. असं उत्तर लिंगायत धर्मगुरूंनी भागवत यांना दिलं आहे. आम्ही हिंदू धर्मात आलोच तरी आम्हाला शुद्र म्हणूनच गणलं जाईल असंही त्यांनी म्हटलंय.
 आता या मुद्याला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे. भागवतांनी केलेल्या वक्तव्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी भाजप विरोधक त्याचा वापर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिहारनंतर आता कर्नाटकात मोहन भागवत यांचं वक्तव्य भाजपला अडचणीत आणण्याची शक्यता आहे.

COMMENTS