जनतेशी संवाद राहिला नसल्याने सरकारवर संवादयात्रा काढण्याची वेळः खा. अशोक चव्हाण

जनतेशी संवाद राहिला नसल्याने सरकारवर संवादयात्रा काढण्याची वेळः खा. अशोक चव्हाण

राज्यभरात शेतक-यांचा वाढता असंतोष, विरोधी पक्षांच्या संयुक्त संघर्ष यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद या पार्श्वभूमीवर पायाखालची वाळू सरकल्यानेच विसंवादी राज्य सरकारने जनतेसमोर मगरीचे अश्रू ढाळण्याकरिता संवाद यात्रा काढण्याची घोषणा केली आहे,अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

 

संवादयात्रा काढण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर प्रतिक्रिया देताना खा. अशोक चव्हाण म्हणाले की, सरकारमध्ये बसलेल्या लोकांना ग्रामीण भागाचे आणि शेतक-यांचे प्रश्च समजत नाहीत. सरकारचा लोकांशी संवाद राहिला नाही त्यामुळे सरकारवर संवादयात्रा काढण्याची वेळ आली आहे. राज्यातील नऊ हजारापेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत पण सरकारने कर्जमाफीचा निर्णय न घेतल्याने सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन संयुक्त संघर्ष यात्रा काढली. विरोधकांच्या संघर्ष यात्रेला राज्यातील शेतक-यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्यामुळे पायाखालची वाळू सरकल्यानेच सरकारने संवादयात्रा काढण्याची घोषणा केली आहे पण राज्यातील जनता विसंवादी सरकारच्या संवादयात्रेला प्रतिसाद देणार नाही.

 

उत्तर प्रदेशात भाजपच्या सरकारने शेतक-यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला पण राज्यातले भाजप सरकार शेतक-यांना कर्जमाफी देत नाही त्यामुळे राज्यभरात सरकारविरोधात प्रचंड संताप आहे. तूर खरेदी केंद्र बंद करून सरकारने शेतक-यांना मोठ्या संकटात टाकले आहे. त्यातच रोज निय़म बदलून जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण केला जात आहे. वारंवार शब्द फिरवून आणि तूर खरेदी बंद करून सरकारने शेतक-यांना मरणाच्या दारात उभे केले. पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी तुरीचा शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत तूर खेरदी केंद्र सुरु राहतील अशी घोषणा केली. मात्र फक्त 22 एप्रिलपर्यंत केंद्रावर नोंदणी झालेली तूर खेरदी केली जाईल असे मुख्यमंत्री म्हणतात. मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून तीन दिवस झाले तरी खरेदी केंद्रावर नोंदणी केलेल्या तुरीची खरेदीही सुरु झाली नाही. या सरकारच्या मंत्र्यामध्ये आणि प्रशासनामध्ये ही संवाद राहिला नाही, हे जनतेशी काय संवाद साधणार ? असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

 

 

 

COMMENTS