मुंबई – 1 मे महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिवस आता जर्मनीमध्ये साजरा होणार आहे. जर्मनीतील म्युनिक शहरामध्ये दि. 6 व 7 मे 2017 रोजी ‘महाराष्ट्र दिन’ साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासन व म्युनिक येथील भारतीय महावाणिज्य दूतावास आणि स्थानिक महाराष्ट्र मंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त म्युनिक मराठी चित्रपट महोत्सव, महाराष्ट्रीयन खाद्य महोत्सव, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ छायाचित्र प्रदर्शन, महाराष्ट्र मंडळ म्युनिक प्रस्तुत ‘हसरी संध्याकाळ’ असे विविध कार्यक्रम होणार आहे. त्यामूधन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यात येईल. हे सर्व कार्यक्रम 6 मे रोजी सकाळी 10 ते सायं. 5.00 तर 7 मे रोजी सकाळी 10.30 ते दु. 1.30 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातूनही विविध कलाकार उपस्थित राहणार आहे.
जर्मनीतील भारताचे महावाणिज्य दूत श्री.सुगंध राजाराम म्हणाले की, म्युनिकमध्ये गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र दिन साजरा होत आहे.परंतु तो छोट्या प्रमाणावर होत असे. यावर्षी मात्र म्युनिक मधील मराठी नागरिकांसोबत बावरिया राज्यातील विविध शहरांमधील भारतीय नागरिक सहभागी होतील. या कार्यक्रमातून जर्मनीतील लोकांना भारतातील विविध राज्यांच्या संस्कृतीची ओळख करुन दिली जाईल. ‘मेक इन इंडिया’या उपक्रमांतर्गंत जर्मन उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी परिसंवादांच्या माध्यमातून आकर्षित केले जाणार आहे. जर्मनीतील महाराष्ट्राचे मित्रराज्य व्युर्टेमबर्गची राजधानी स्टुटगार्ट येथेही असाच उपक्रम लवकरच आयोजित केला जाणार आहे. भारताच्या विविध राज्यातील संस्कृतीची ओळख करुन घेण्यासाठी त्या त्या राज्याचे दिवस साजरे करण्याच्या संकल्पनेला पाठिंबा दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. असेही सुगंध राजाराम यांनी सांगितले.
महाराष्ट्र मंडळ म्युनिकचे अध्यक्ष आशुतोष सोहनी म्हणाले की, मंडळाचे सभासद आणि म्युनिकमधील मराठी भाषिक या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. तसेच या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे स्वरुप देऊन त्याच्या यशस्वीतेकरिता विशेष प्रयत्न केले जात आहेत.
म्युनिक मराठी चित्रपट महोत्सवात 6 मे रोजी दुपारी 1.30 वा. ‘टेक केअर गुड नाईट’,7 मे रोजी सकाळी 10.30 वा.मराठी सिनेसृष्टीतला सुप्रसिध्द ‘नटसम्राट’, 13 मे रोजी सकाळी 10.30 वा. दशक्रिया हे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. महाराष्ट्रीयन खाद्य महोत्सवात महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांची मेजवानी असणार आहे. यात मुंबईचा सुप्रसिध्द वडापाव, कोल्हापुरी मिसळ, पाणीपुरी, भेळ, मसाले भात, मठ्ठा, श्रीखंड, मोदक, कुल्फी अशा विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ छायाचित्र प्रदर्शनात ऐतिहासिक वारसा लाभलेल्या स्थळांचे छायाचित्रांचे प्रदर्शन भरविले जाणार आहे. यात ताडोबा अभयारण्यातील वाघ, गेट वे ऑफ इंडिया, त्र्यंबकेश्वर मंदिर, शनिवार वाडा, अंजिठा-पद्मपाणी, मरिन ड्राईव्ह, प्रतापगड यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र मंडळ म्युनिक प्रस्तुत ‘हसरी संध्याकाळ’ या कार्यक्रमात प्रख्यात गायक त्यागराज खाडिलकर आणि हास्यसम्राट दीपक देशपांडे यांच्या विनोद, किस्से, नकला आणि गायनांची रेलचेल असणार आहे.
COMMENTS