‘जीएसटी’चा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेणार असतील तर मग विशेष अधिवेशन कशाला बोलावले?

‘जीएसटी’चा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेणार असतील तर मग विशेष अधिवेशन कशाला बोलावले?

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा संतप्त सवाल

–  मुंबई मनपाच्या आर्थिक हितासाठी ‘जीएसटी’त हस्तक्षेप करणारे उद्धव ठाकरे शेतकरी कर्जमाफीच्या वेळी मूग गिळून का बसतात?

– शिवसेनेचे संपर्क अभियान शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी की पुढील निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार शोधण्यासाठी?

 

‘जीएसटी’ संदर्भात अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेणार असतील तर सरकारने विधीमंडळाचे विशेष अधिवेशन कशासाठी बोलावले? असा संतप्त सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

 

‘जीएसटी’ संदर्भात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्धव ठाकरेंकडे फेऱ्या मारत असल्याच्या बातमीसंदर्भात प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. यावेळी विखे पाटील म्हणाले की, सरकारला‘जीएसटी’बाबत घटक पक्षांशी चर्चा करायची असेल तर त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत बैठक घ्यायला हवी. परंतु, त्याऐवजी सरकार उद्धव ठाकरेंच्या रूपात घटनाबाह्य व्यक्तीच्या दारात उभे झाल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांना सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काडीचाही अधिकार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

 

मुंबई मनपाचे पर्यायाने खंडणीखोर व मांडवलीबहाद्दर शिवसेनेचे आर्थिक हित जपण्यासाठी ‘जीएसटी’त हस्तक्षेप करायला उद्धव ठाकरेंकडे वेळ आहे. पण् शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारशी साधी चर्चा करायलाही त्यांना सवड नाही, यातून शिवसेनेचे‘ध्येय’ आणि ‘धोरणे’ स्पष्ट होतात, अशी बोचरी टीका विखे पाटील यांनी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा आव आणून उद्धव ठाकरेंनी शिवसंपर्क अभियान सुरू केले. पण् त्या माध्यमातून बळीराजाचे दुःख जाणून घेण्याऐवजी पुढील निवडणुकीकरिता संभाव्य उमेदवारांची शोधमोहिम सुरू आहे. शेतकऱ्यांचा असा विश्वासघात यापूर्वी कधीही झाला नव्हता, असेही विरोधी पक्षनेते म्हणाले.

 

 

 

COMMENTS