ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अरुण साधू यांचे निधन, मुख्यमंत्र्यांसह राजकीय वर्तुळातून श्रद्धांजली !

ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अरुण साधू यांचे निधन, मुख्यमंत्र्यांसह राजकीय वर्तुळातून श्रद्धांजली !

मुंबई – ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अरुण साधु यांचं आज पहाटे साडेचारच्या सुमारास निधन झालं. सायन हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. साधू यांनी देहदान केले आहे. पत्रकारिता, साहित्यक्षेत्र, राजकीय वर्तुळ तसेच समाजाच्या सर्वच स्तरातून साधू यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

अरूण साधू यांच्या निधनाने मराठी साहित्याला वास्तववादाचे वळण देणारा लेखक आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, आंतरराष्ट्रीय  व्यवहार आणि सामाजिक स्थित्यंतराचे अभ्यासू निरीक्षक असलेल्या श्री. साधू यांनी मराठी वाचकाला वास्तववादी दर्शन घडवले. त्यांच्या कादंबऱ्या समकालिन राजकीय- सामाजिक स्थितीचे यथार्थ दर्शन घडवितात.  मराठी साहित्याला समृद्ध करतानाच त्यांची पत्रकारितेला एक वेगळा आयाम दिला त्यासोबतच पत्रकारांच्या नव्या पिढ्या घडविल्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा  गौरव प्राप्त झालेल्या श्री. साधू यांचे व्यापक लिखाण पत्रकारिता आणि साहित्य विश्वात येऊ पाहणाऱ्यांसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या निधनाने केवळ एक व्यासंगी पत्रकार आणि लेखकासोबतच  पत्रकार घडविणारा प्राध्यापक आपण गमावला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा

साहित्य, राजकीय व सामाजिक क्षेत्रावर अधिकारवाणीने लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार अरूण साधू यांना विनम्र श्रद्धांजली…

COMMENTS