…तर शिवसेनेचे 17 आमदार भाजपासोबच राहतील, राणेंचा गौप्यस्फोट

…तर शिवसेनेचे 17 आमदार भाजपासोबच राहतील, राणेंचा गौप्यस्फोट

एकीकडे नारायण राणे काँग्रेसचा हात सोडून भाजपचा कमळ हातात धरतील अशी चर्चा मागील अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगते आहे. मात्र पुन्हा एकदा नारायण राणे यांनी भाजपकडून आपल्याला ऑफर आल्याचा गौप्यस्फोट केला. नुकताच नारायण राणे यांनी एका प्रसार माध्यमाच्या चर्चेदरम्यान हे व्यक्तव्य केलं.

शिवसेना सत्तेत राहूनही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर टीका करत आहे. प्रसंगी सत्तेतून बाहेर पडण्याचा इशाराही देत आहे. मात्र, शिवसेनेने फडणवीस सरकारचा पाठिंबा काढला तरी शिवसेनेतील 17 आमदार भाजपासोबच राहतील, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केला आहे.

दरम्यान , राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर नारायण राणे यांनी भाजपात प्रवेश केल्यास राज्यातील सत्तेतून शिवसेना बाहेर पडण्याची सूत्रांनी दाट शक्यता वर्तविली होती. अश्यात आता नारायण राणेंनी पुन्हा भाजपात प्रवेश करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं नारायण राणे खरच भाजपात प्रवेश करणार की नाही हा संभ्रम निर्माण झाला.

नारायण राणे हे काँग्रेस पक्षावर नाराज असल्याचं मागील अनेक दिवसांपासून दिसून येत आहे. त्यामुळंच त्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन पक्षाविरुद्ध नाराजी व्यक्त केली होती. मात्र राहुल यांनी याकडे दुर्लक्ष केले. यानंतर नारायण राणे यांनी अहमदाबाद येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांची भेट घेतल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आल्यानंतर मात्र काँग्रेसच्या भुवया उंचावल्या. तेव्हा राहुल गांधी याच्या कोअर ग्रुपमधील सदस्य खासदार मिलींद देवरा यांनी राणे यांच्याशी बोलून याप्रकरणी मार्ग काढण्याचा प्रयत्न ही केला. तसेच सोनिया गांधींचे सहकारी मनीष तिवारी यांनी ही राणेच्या मनधरणीसाठी मुंबईवारी केली होती. यानंतर त्यांच्या मनधरणीसाठी पक्षाकडून दिल्लीतून हालचाली सुरु झाल्यात. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांचे सल्लागार अहमद पटेल यांनी राणेंची समजूत काढण्यासाठी त्यांना दिल्लीत बोलावले. काँग्रेस पक्षात अनेक बदल होत असून राणे यांना महत्त्वाचे पद देऊ केले जाईल अशी ही चर्चा होती. त्यानंतर आता नारायण राणे यांनी परत एकदा भाजपकडून ऑफर आली मात्र जाणार नसल्याचं स्पष्ट केल्यानं त्यांना काँग्रेसकडून मोठं पद तर देण्यात आले नाही ना? अशी चर्चा पुन्हा रंगली.

 

COMMENTS