शेतक-यांच्या कर्जमाफी संदर्भात रावसाहेब दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य

शेतक-यांच्या कर्जमाफी संदर्भात रावसाहेब दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य

अहमदनगर – भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी कर्जमाफी संदर्भात अजब सल्ला दिला आहे. कर्जमाफी केल्यास शेतकरी आत्महत्या करणार नाही ? असा प्रस्ताव सर्व विरोधकांनी द्यावा. कर्ज माफ करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत असतील तर विरोधकांनी एकत्र यावे आणि शेतकरी आत्महत्या करणार नाही यासाठी प्रस्ताव द्यावा, असा सल्ला दानवेंनी दिला आहे.
शेतकरी कर्जमाफीवर असे वादग्रस्त वक्तव्य दानवेंनी केले आहे. आमच्यावर काय आरोप होत आहेत याची चिंता नाही. पायाभूत सुविधा देण्याकडे आमचा भर असल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. शिवसेनेची नाराजी आमच्यावर नाही, ती जनतेवर आहे. विधानसभेत शिवसेनेपेक्षा भाजपला जास्त जागा का दिल्या म्हणून जनतेवर व्यक्त करू शकत नाही म्हणून आमच्यावर नाराज होतात, अशी बोचरी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शिर्डीत केली.
शिवसेनेसंबंधी वक्तव्य करताना ते म्हणाले, की आम्ही एकत्रच आहोत आणि यापुढेही राहू. नारायण राणे भाजपमध्ये केव्हा येणार यावर त्यांनी राणेंनाच विचारा, असा टोमणा मारला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी राजकीय जोडे बाहेर काढून विरोधकांनी आम्हाला तोडगा सुचवावा. आम्ही तो स्वीकारायला तयार आहोत, असेही ते पुढे म्हणाले. कर्जमाफीच्या विरोधात भाजप नाही. जोपर्यंत शेतीमध्ये वीज, रस्ते, सिंचन इत्यादीची शाश्वत गुंतवणूक होत नाही तोपर्यंत कर्जमाफी केल्याचा काहीही उपयोग होणार नाही. यापूर्वीच्या सरकारांनी 2 वेळा कर्जमाफी दिली होती. त्याचा फायदा शेतकऱ्याऐवजी बँकांना झाला आहे. आत्महत्या थांबल्या नाहीत. म्हणून आमच्या सरकारचा प्रयत्न शेतकऱ्यांना सक्षम करणे हा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

COMMENTS