…..तर  सचिन तेंडुलकर आणि रेखा यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा

…..तर सचिन तेंडुलकर आणि रेखा यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा

सचिन तेंडुलकर आणि रेखा यांना जाहिराती करायला वेळ आहे, इतर ठिकाणी जायला वेळ आहे, मग राज्यसभेत यायला वेळ का नाही? त्यांना जर राज्यसभेत यायचे नाही तर त्यांनी सरळ खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी केली आहे. रेखा आणि सचिन तेंडुलकर यांच्या गैरहजेरीवर आज राज्यसभेत अग्रवाल यांनी चांगलाच गोंधल घातला. मला हा मुद्दा वारंवार उचलावा लागतो आहे, असे म्हणत त्यांनी आज पु्न्हा एकदा तेंडुलकर आणि रेखा यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा उचलून धरला.  

कला आणि क्रीडा या विभागातून नामवंत व्यक्तींना खासदार म्हणून राज्यसभेवर पाठवले जाते. मात्र रेखा आणि सचिन तेंडुलकर यांनी मागील तिन्ही अधिवेशनात हजेरी लावली नाही. ते राज्यसभेत आले आहेत, अशी वेळ अत्यंत कमीवेळा आली आहे. खासदार म्हणून या दोघांनाही राज्यसभेवर येण्यात स्वारस्य नसेल तर त्यांनी सरळ खासदारकी सोडावी आणि घरी जावे, मात्र राज्यसभेची खासदारकी घ्यायची आणि तिथले नियम पाळायचे नाहीत, याला काय अर्थ आहे? असा सवालही नरेश अग्रवाल यांनी उपस्थित केला आहे.

जाहिराती करण्यासाठी या दोघांकडे वेळ आहे. मात्र, राज्यसभेत यायला वेळ नाही. त्यांना या अधिवेशनात आणि लोकांच्या प्रश्नात काहीही रस नाही, हेच त्यांच्या गैरहजेरीवरून दिसून येत आहे. याआधी देखील हा मुद्दा वारंवार मांडला गेला आहे. मात्र त्यांना कोणीही सदनात येण्याबाबत जाब विचारत नाही. सचिन तेंडुलकर आणि रेखा यांना लोकांच्या प्रश्नांशी घेणे देणे नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी नरेश अग्रवाल यांनी केली आहे.

 

COMMENTS