…. तर सरकारमधून बाहेर पडू, उद्धव ठाकरे यांचा इशारा

…. तर सरकारमधून बाहेर पडू, उद्धव ठाकरे यांचा इशारा

मुंबई – राज्य सरकारनं शेतक-यांसाठी कर्जमाफीची घोषणा केलीय. मात्र ही मान्य करताना तत्वतः असा शब्द वापरला आहे. त्यामुळे शेतक-यांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कर्जमाफीबाबत साशंकता आहे. खरोखरच गरजवंत शेतक-यांना माफी मिळेल का ? असा प्रश्न त्यांना पडला आहे. सरकारने घोषणा केली खरी, पण मिळेपर्यंत काही खरे नाही, सरकारच्या हमीला भाव नाही या शब्दात उद्धव ठाकरे यांनी सरकारवरील आपला अविश्वास व्यक्त केला. सरकार कर्जमाफीचे निकष काय ठरवतंय आणि  कशा प्रकारे कर्जमाफी दिली जाते ते पाहू. जर शेतकर-यांना न्याय मिळाला नाही तर शेतक-यांसोबत शिवसेना पुन्हा रस्त्यावर उतरेल आणि वेळ आलीच तर सत्तेचीही पर्वा करणार नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारला इशारा दिला. सरकारच्या तत्वतः या शब्दावरही उद्धव यांनी फटकारलं, मला सरकारची भाषा कळत नाही. मला शब्दांच्या खेळात पडायचं नाही. मला शेतकर्यांची सामान्य भाषा समजते. मला  शेतकर्यांचा सात बारा कोरा करून पाहीजे असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. स्वामीनाथन आयोगाची अमलबजावणी झाली पाहीजे असंही उद्धव म्हणाले. शेतकरी कर्जमाफी ही शेतक-यांच्या एकजुटीचा विजय आहे. शिवसेनेने संपाला उघडपणे पाठिंबा दिला होता. त्यामुळेच संप यशस्वी झाला असा दावाही त्यांनी केला. शिवसेनेचं मी कर्जमुक्तं होणार हे शेतकर्यांसाठी सुरू केलेलं  अभियान बंद केलेलं नाही. त्याच्या वेळापत्रकात थोडा बदल केलांय. माझा शेतकर्यांशी संवाद सुरूच रहाणार असंही उद्धव म्हणाले. काल रात्री पुणतांब्याच्या शेतक-यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकराल हा इशारा दिला आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या निकषावरुन चांगलाच वाद पेटण्याची शक्यता आहे.

COMMENTS