ताजमहल भारतीय संस्कृतीवरील डाग- भाजप आमदार

ताजमहल भारतीय संस्कृतीवरील डाग- भाजप आमदार

‘ताज महालच्या निर्माण कर्त्याने उत्तर प्रदेश आणि भारतातील हिंदूंचे उच्चाटन करण्याचेच काम केले. तो एक देशद्रोही होता. त्यामुळे ताजमहाल हा भारतीय संस्कृतीवरील लागलेला एक डाग आहे. असं वादग्रस्त विधान भाजपचे आमदार संगीत सोम यांनी केले आहे.

सोशल मीडियावरून सोम यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘जेव्हा ताजमहालला उत्तर प्रदेश सरकारच्या पर्यटन पुस्तिकेतून वगळण्यात आले, तेव्हा बरेच लोक दुःखी झाले. ताजमहालच्या निर्माण कर्त्याने उत्तर प्रदेश आणि भारतातील हिंदूंचे उच्चाटन करण्याचेच काम केले. जर अशा लोकांचा उल्लेख इतिहासात केला असेल तर ते दुर्दैवी असून ही वास्तू भारतीय संस्कृतीला लागलेला एक कलंक आहे.

उत्तर प्रदेश सरकारने अलीकडेच प्रकाशित केलेल्या पर्यटन पुस्तिकेत ताजमहालचे नाव वगळले होते. यानंतर काँग्रेसने योगी सरकारला धारेवर धरत इतिहासाची प्रतारणा केल्याचा आरोप केला. राज्य पर्यटन मंत्री रीता बहुगुणा जोशी यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तिकात आदित्यनाथचे गोरखधाम मंदिर आणि मथुरा आणि अयोध्या मंदिर यांचा समावेश आहे.

सोम म्हणाले की, केंद्रातील आणि राज्यातील सरकार भारताच्या इतिहासाला लागलेले कलंक पुसण्याचे काम करत आहे. आपल्या देशाचा चांगला, पण लपून राहिलेला इतिहास जनतेच्या समोर आणण्याचे काम दोन्ही सरकारांकडून केले जात आहे. इतिहासाची ही दुरुस्ती अनेकांना खुपत असून ते चुकीच्याच इतिहासाचे समर्थन करताना दिसत आहेत.’

फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करून मुजफ्फरनगरमध्ये जातीय हिंसाचाराला खतपाणी घातल्याचा आरोप आमदार सोम यांच्यावर आहे.

 

COMMENTS