तुरीची विक्रमी 67 लाख 35 हजार क्विंटल खरेदी

तुरीची विक्रमी 67 लाख 35 हजार क्विंटल खरेदी

राज्यात साडेतीन लाख शेतकऱ्यांना 3341 कोटींची देणी वितरित 

राज्यात गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन झालेल्या तुरीची केंद्र आणि राज्य शासनाकडून 67 लाख 34 हजार 756 क्विंटल एवढ्या विक्रमी प्रमाणात खरेदी करण्यात आली आहे. विविध केंद्रांवर 3 लाख 54 हजार 417 शेतकऱ्यांकडून 3 हजार 401 कोटी रुपये किंमतीची तूर खरेदी करण्यात आली असून त्यांना 3 हजार 341 कोटी 32 लाख रुपयांची देणी वितरित करण्यात आली आहेत.

तुरीची किमान आधारभूत किंमत 2016-17 या वर्षासाठी केंद्राच्या 425 रुपयांच्या बोनससह प्रतिक्विंटल एकूण 5050 रुपये ठरविण्यात आली होती. या किमान आधारभूत दराने राज्यात 15 डिसेंबर 2016 पासून 12 जून 2017 या कालावधीत केंद्र शासनामार्फत किंमत स्थिरता निधी अंतर्गत 51 लाख 69 हजार 40 क्विंटल आणि राज्य शासनामार्फत बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत 15 लाख 65 हजार 716 क्विंटल अशी एकूण 67 लाख 34 हजार 756 क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. नाफेड, एफसीआय व एसएफएसीच्यावतीने पणन महासंघ, विदर्भ पणन महासंघ व महाएफपीसी या संस्थांमार्फत तूर उत्पादक जिल्ह्यांमधील 323 खरेदी केंद्रांवर ही खरेदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या तुरीची 3 हजार 341 कोटी 32 लाख रुपयांची देणी वितरित करण्यात आली असून उर्वरित 59 कोटी 36 लाख रुपयांची देणी वितरित करण्याची प्रक्रिया गतीने सुरू आहे.

त्याचप्रमाणे राज्यातील तूर खरेदी केंद्रावर 31 मे 2017 पर्यंत टोकन देण्यात आलेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यासंदर्भातील शासन निर्णय आजच काढण्यात आला आहे. मात्र, या तुरीची खरेदी करताना ती शेतकऱ्यांची आहे की व्यापाऱ्यांची याची काटेकोर तपासणी केली जाणार आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी राज्यातील पिकांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांना योग्य बाजारपेठ निर्माण करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. देशांतर्गत बाजारपेठेतील तुरीचे भाव स्थिर राहण्यासाठी तुरीच्या आयातीवरील शुल्क वाढवून ते 25 टक्के करण्याची राज्याकडून केंद्राला विनंती करण्यात आली आहे. तसेच तुरीचे दर स्थिर राहण्यासाठी दीर्घकालीन धोरण आवश्यक असून त्यादृष्टीने वाटचाल सुरू आहे.

COMMENTS