राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची बुधवारी भेट घेतली. या भेटीत राष्ट्रपतिपदाची निवडणूक आणि सध्याची राजकीय स्थिती या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार देण्याच्या हालचाली विरोधकांनी सुरू केल्या आहेत. विरोधकांचा संयुक्त उमेदवार म्हणून पवार यांचे नाव सध्या चर्चेत आहे. यापार्श्वभूमीवर, पवार-सोनिया भेटीला महत्व आहे.
सोनियांच्या दहा जनपथ निवासस्थानी दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. याआधी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, भाकप नेते डी.राजा, जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांनी सोनियांची भेट घेतली. त्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांच्या गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्याचे चित्र आहे. याशिवाय, भाजपच्या विरोधात राजकीय संघर्ष करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहनही काही नेते करत आहेत. त्यामुळेही या भेटीगाठींचे महत्व वाढले आहे.विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची प्रक्रिया राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीपासून सुरू होईल, अशी चिन्हे आहेत.
विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 24 जुलैला समाप्त होणार आहे. त्यापूर्वी नव्या राष्ट्रपतींची निवड करावी लागणार आहे.
COMMENTS