दिल्ली विधानसभेत राडा, ‘आप’ आमदारांची कपिल मिश्रांना मारहाण

दिल्ली विधानसभेत राडा, ‘आप’ आमदारांची कपिल मिश्रांना मारहाण

‘आप’च्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात बोलणाऱ्या आपल्याच सहकाऱ्याला मारहाण करून त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याची घृणास्पद घटना आज (बुधवारी) घडली . वस्तू व सेवा कर विधेयकावर (जीएसटी) चर्चा करण्यासाठी दिल्ली विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले होते. यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे समर्थक असलेल्या आमदारांनी ‘आप’चे बंडखोर आमदार कपिल मिश्रा यांच्यावर सामूहिक हल्ला चढवला. मिश्रा यांना मारहाण केली   तसेच एका आमदाराने कपिल मिश्रा यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला.

अलिकडेच मिश्रा यांनी दिल्ली सरकार आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याच रागातून पक्षाच्या आमदारांनी मिश्रा यांना धक्काबुक्की केल्याचे मानले जाते. काही आमदारांनी कपिला मिश्रा यांचा गळा पकडला होता तर, काही त्यांना लाथ मारत असल्याचे दिसत होते.  प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे दिसताच विधानसभेतील मार्शल्सकरवी कपिल मिश्रा यांना  सभागृहाबाहेर काढण्यात आले. कपिल मिश्रा यांनी केजरीवालांवर आरोप केल्यानंतर त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर कपिल मिश्रा यांना मंत्रिपदावरुन हटवण्यात आले. तेव्हापासून त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. केजरीवालांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी ते उपोषणालाही बसले होते.

या प्रकारानंतर सभागृहाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार कपिल मिश्रा यांनी पुन्हा एकदा केजरीवालांवर हल्लाबोल केला आहे. केजरीवालांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळंच मला लक्ष्य करण्यात येत आहे. केजरीवाल व सत्येंद्र जैन यांच्या घोटाळ्यावर चर्चा करण्यासाठी दिल्ली विधानसभेचं विशेष अधिवेशन रामलीला मैदानात बोलावण्यात यावं अशी मागणी मी आज केली. तेव्हा अचानक ‘आप’चे आमदार आले आणि मला मारहाण सुरू केली असा आरोप कपिल मिश्रा यांनी केला आहे.

 

 

 

COMMENTS