दिवाकर रावतेंना सीमेवरच अडवलं, बेळगावमध्ये प्रवेश नाकारला !

दिवाकर रावतेंना सीमेवरच अडवलं, बेळगावमध्ये प्रवेश नाकारला !

बेळगावसह सीमा भागामध्ये महापालिका, नगरपालिका अथवा विधानसभा सदस्यांनी यापुढे ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्यास पद रद्द करण्यात येणार असल्याचा अजब फतवा कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी काढला. या कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरोधात बेळगावातील मराठी जनतेकडून मोर्चा काढण्यात आला. मात्र या मोर्चात शिवसेना नेते दिवाकर रावते यांना परवानगी नाकारण्यात आली आहे.

 

दिवाकर रावते या मोर्चात सहभागी होण्यासाठी कोल्हापूरहून बेळगावच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, कागलमधील कोगनोळी फाट्याजवळ कर्नाटक पोलिसांकडून रावते यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्यात आला. पोलिसांनी दिवाकर रावते आणि जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना बेळगावमध्ये दाखल होण्यास परवानगी नाकारली. यावेळी पोलिसांकडून दिवाकर रावते आणि संजय पवार यांना कन्नड भाषेतील जिल्हाबंदीच्या नोटीस देण्यात आल्या. मात्र, रावते यांनी मराठी भाषेतील नोटीस देण्याचा आग्रह धरला. जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 24 ते 27 मेपर्यंत ही प्रवेशबंदी लागू राहणार आहे. दिवाकर रावते यांना पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने परतावे लागले. मी महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्याठिकाणी गेलो होतो. मात्र, कर्नाटक सरकारकडून मला प्रवेश नाकारण्यात आला. मी केवळ शिवसेनेचाच प्रतिनिधी असतो तर ही बंदी नक्कीच झुगारली असती, असे रावते यांनी म्हटले.

 

दरम्यान, आज बेळगावातील संभाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांसह बेळगावातील मराठी जनता सहभागी झाली आहे. या पार्श्वभूमीवर याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

COMMENTS