रक्त कर्करोगाशी संबंधित रुग्णांना मिळणार नवजीवन  !

रक्त कर्करोगाशी संबंधित रुग्णांना मिळणार नवजीवन !

मुंबई –  देशातील पहिल्या मॅरो डोनर रजिस्ट्रीचा शुभारंभ केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज नागपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभाग आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरु करण्यात येणार असून या निमित्ताने सकाळी 9 वाजता शासकीय महाविद्यालय येथून भव्य रॅली निघणार आहे. त्यात विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

गिरीष  महाजन म्हणाले, अप्लास्टिक ॲनिमिया,सिकल सेल ॲनिमिया, थॅलेसेमिया, लिम्फोमा इ. रक्त कर्करोगांशी संबंधित असाध्य आजारांवर बोन मॅरो उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांना नवीन जीवनदानच मिळणार आहे.  देशभरात बोन मॅरोची आवश्यकता असलेले जवळपास तीन ते चार हजार रुग्ण दरवर्षी नव्याने तयार होत आहेत. बोन मॅरो देऊ इच्छिणारे दाते तसेच ज्या रुग्णांना बोन मॅरोची आवश्यकता आहे, अशांची यादी या रजिस्ट्रीत तयार करण्यात येणार असून या माहितीच्या आधारे बोन मॅरोची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना त्यांच्याशी जुळणाऱ्या बोन मॅरोची उपलब्धता होणार आहे. ज्याप्रमाणे रक्तदात्यांची रक्तपेढी (ब्लड बॅंक) असते, त्याच धर्तीवर बोन मॅरो (मज्जा) रजिस्ट्री तयार करण्यात येणार आहे. यासाठी लागणाऱ्या अद्ययावत मशिनरीसाठी टाटा ट्रस्टने 60 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याचेही वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

बोन मॅरो रजिस्ट्री हा देशातील पहिलाच उपक्रम असून यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  बोन मॅरो रजिस्ट्रीची ऑनलाईन सेवा उपलब्ध करुन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. याचा हजारो रुग्णांना निश्चीतच फायदा होणार असल्याची माहिती  महाजन यांनी यावेळी दिली.

रक्तदानाइतकीच बोन मॅरो दान ही प्रक्रिया सुध्दा सोपी असल्याने बोन मॅरो दात्यांनी रक्त कर्करोगांशी झगडणाऱ्या रुग्णांचे प्राण वाचावेत या मानवतेच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर आपली नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन महाजन यांनी केले आहे.

 

COMMENTS