दौंड- मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणास आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. दौंड- मनमाड या 247.5 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे दुहेरीकरण होणार असून या कामासाठी सुमारे 2,330 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प 2021-22 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पामुळे अहमदनगरमधील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. देशातील उत्तर- दक्षिण भाग जोडणाऱ्या या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण होत असल्याने प्रवासी वाहतूक आणि माल वाहतुकीला फायदा होणार आहे. याशिवाय शिर्डी आणि शनि- शिंगणापूरला येणाऱ्या भाविकांना याचा फायदा होणार आहे. अहमदनगर हे लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख तळ असल्याने लष्करालाही याचा लाभ होणार आहे. मुंबई- चेन्नई मार्गावर भिगवण- मोहोळ आणि होटगी- गुलबर्गा या मार्गाच्या दुहेरीकरणाचे कामही सुरु असून हे तिन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यावर दौंड- मनमाड मार्गावरील रेल्वे वाहतूक वाढेल आणि भविष्यात अहमदनगरचे महत्त्व वाढेल असे रेल्वेचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.या प्रकल्पामुळे रोजगारालाही चालना मिळेल असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
COMMENTS