धनगर समाजाला लवकरच आरक्षण मिळणार- खासदार डॉ. विकास महात्मे

धनगर समाजाला लवकरच आरक्षण मिळणार- खासदार डॉ. विकास महात्मे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकारने देशभरातील ओबीसींना घटनात्मक अधिकार मिळवून दिले आहेत. यामुळे ओबीसी समाजातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ओबीसींना नोकरी, शिक्षण, रोजगार व स्वयंरोजगारात लाभ होईल. ओबीसी समाजाचा विकास होऊन देश विकासालाही चालना मिळेल. तसेच धनगर समाजालाही लवकरच आरक्षण मिळेल, असा विश्वास राज्यसभेतील खासदार डॉ. विकास महात्मे यांनी आज (दि. 13) चिंचवड येथे व्यक्त केले.

खासदार डॉ. महात्मे यांनी गुरुवारी पिंपरी चिंचवड शहराला भेट दिली. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, शहर सरचिटणीस बाबू नायर, प्रमोद निसळ, उमा खापरे, सदाशिव खाडे आदी उपस्थित होते.

धनगर समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. केंद्र आणि राज्‍यातील भाजप सरकारने याबाबत सकारात्‍मक पाऊल उचलले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये धनगर आरक्षणाची मागणी पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्‍त केला जात होता. परंतु, धनगर आरक्षण विधेयक काही आले नाही. याविषयी अधिक माहिती देताना खा. डॉ. महात्‍मे म्‍हणाले की, मी राज्‍यसभेत आवाज उठवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतली. तसेच 11 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. टाटा कंपनीला धनगर आरक्षणाबाबत माहिती गोळा करण्यास काही कालावधी लागणार असल्यामुळे 15 नोव्हेंबरपर्यंत संशोधन पूर्ण होऊन लवकरच धनगर समाजाला आरक्षण मिळेल, असा विश्वास डॉ. महात्‍मे यांनी व्यक्‍त केला.

 

 

COMMENTS