भाजप नगरसेवक अमोल बालवडकरांना जामीन मंजूर

भाजप नगरसेवक अमोल बालवडकरांना जामीन मंजूर

एक दिवसाच्या कारावासानंतर भाजप नगरसेवक अमोल बालवडकर यांचा जामीन न्यायालयाने आज (गुरुवार) मंजूर केला आहे. त्यामुळे बालवडकर यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

 

वाहतूक पोलिसांना दमदाटी करत सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे अटकेत असलेले भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांचा जामीन अर्ज न्यायालयाने काल (दि.12) फेटाळला होता. त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या असून 25 एप्रिलपर्यंत त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर आज न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर बालवडकर यांचा जामीन मंजूर केला आहे.

 

जगंली महाराज मंदिरासमोरील पार्किंगमध्ये चारचाकी उभी केल्याने वाहतूक पोलिसांनी अमोल बालवडकर यांच्या गाडीवर जॅमर लावून कारवाई केली होती. हा प्रकार सोमवारी (दि. 10 एप्रिल) घडला होता. आपल्या गाडीवर कारवाई केल्याचा राग आल्याने बालवडकर यांनी वाहतूक पोलिसांना दमदाटी केली होती. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. याप्रकरणी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर डामसे यांनी फिर्याद दिली होती. नगरसेवक बालवडकर यांनी त्यांची कार जंगली महाराज रोडवर नो-पार्किंगमध्ये लावली होती. या ठिकाणी डामसे हे नो-व्हॉल्टिंग बाबत विशेष कारवाई करत होते. डामसे यांनी चालक गणेश चौधरी याला नो-पार्किंगमधून गाडी काढण्यास सांगितले. त्यावेळी त्याने पोलिसांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. डामसे यांनी गाडीला जॅमर लावून पुढील चौकात कारवाईसाठी गेले. त्यावेळी अमोल बालवडकर यांनी आपल्या नगरसेवक पदाचा गैरवापर करून डामसे यांना फोन करून गाडीवर कारवाई करण्यास मनाई केली. परंतु वाहतुकीचा नियम तोडल्यामुळे कारवाई केल्याने डामसे यांनी त्यास नकार दिला. चिडलेल्या नगरसवेकांनी तुम्हाला पाहून घेतो, असे म्हणून डामसे यांना दमदाटी केली. तसेच चालक गणेश चौधरीला त्याचे नाव विचारले असता त्याने प्रशांत शंकर मोटे असे खोटे नाव पोलिसांना सांगितले. डामसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नगरसेवक आणि त्याच्या चालकावर गुन्हा दाखल केला होता.

COMMENTS