नयना पुजारी बलात्कार, हत्याप्रकरणी तिन्ही आरोपींना फाशी

नयना पुजारी बलात्कार, हत्याप्रकरणी तिन्ही आरोपींना फाशी

पुणे – सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणी नयना पुजारी हिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी तिघाजणांना  विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या कोर्टात हा निकाल देण्यात आला.
योगेश अशोक राऊत (वय,24, रा. गोळेगाव, ता. खेड), महेश बाळासाहेब ठाकूर ( वय 24, रा. सोळू, ता. खेड ), विश्वास हिंदुराव कदम (वय 26, रा. दिघीगांव, मूळ गाव ‍भुरकवडी, ता. खटाव, जि. सातारा ) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

काल झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवले होते. त्यामुळे त्यांना आज शिक्षा काय सूनवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज सकाळी पावनेदहा वाजता आरोपीना कोर्टात आणण्यात आले.  त्यानंतर अकरा वाजता सुनावणीला सुरवात झाली. सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी योगेश राऊतला आपली बाजू मांडण्याची संधी दिली असता त्याने माफीचा साक्षीदार राजेश चौधरी यानेच हा गुन्हा केल्या असल्याने त्याला शिक्षा देण्याची मागणी केली. मला लहान मुलगी आणि पत्नी असल्याचा विचार करून कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी केली. हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यानंतर महेश ठाकुरला बोलण्यास सांगितले असता तो काही बोलला नाही. त्यानंतर विश्वास कदमला विचारणा करण्यात आली, त्यानेही राजेश चौधरी दोषी असून त्यालाही शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली.

सरकारी वकील ऍड. हर्षद निंबाळकर यांनी युक्तिवाद करताना नयना पुजारी बलात्कार आणि हत्या प्रकरण नोकरी करणाऱ्या महिलांमध्ये घबराहट पसरविणारे प्रकरण असल्याचे सांगितले.

आरोपींनी घटनेच्या दिवशी नयनाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने बस स्टॉप वरून घेतले.त्यानंतर तिला सुरक्षित स्थळी पोहोचविणे अपेक्षित असताना आरोपीनी तसे न करता तिचे अपहरण केले. तिला कारमध्ये विवस्त्र करत त्याच अवस्थेत पाच तास कार मध्ये फिरवले. तिच्यावर तीन वेळेस बलात्कार केला. त्या अवस्थेत ती मदतीसाठी रडत होती, आरोपीसमोर याचना करत होती. तिची काय अवस्था झाली असेल? आरोपींनी केलेले कृत्य अमानवीय व राक्षसी आहे. केलेले कृत्य उघडकीस येऊ नये म्हणून त्यांनी ओढणीने नयनाचा गळा आवळला. तिच्या चेहऱ्यावर दगडाचे घाव घालून तिचा चेहरा विद्रुप केला.

या खटल्याची कोर्टात सुनावणी सुरु असताना आरोपी राऊत ससून रुग्णालयातून पळून गेला.  त्याला पकडल्यानंतर पळून गेल्याप्रकरणी सहा वर्षे शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपींनी केलेल्या कृत्याचा त्यांना कोणताही पश्चाताप झालेला नाही. त्यामुळे ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना असून या घटनेत आरोपीना मृत्यूदंडांचीच शिक्षा योग्य ठरेल असा युक्तिवाद त्यांनी मांडला.

सध्या चाळीस टक्क्याहून अधिक महिला नोकरी करतात, त्यामध्ये आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे. आरोपींनी केलेले कृत्य महिलांच्या सुरक्षेला धक्का पोहचाविणारे आहे. नयना पुजारी प्रकरणानंतर तिच्या घरच्या लोकांवरती जितका परिणाम झाला तितकाच बाहेर काम करणाऱ्या महिलांवरही झाला आहे.

 

COMMENTS