नवनित कौर राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द,  मुंबई हायकोर्टाचा निर्णय

नवनित कौर राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द,  मुंबई हायकोर्टाचा निर्णय

अमरावती – अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अमरावती लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणार्‍या नवनित कौर-राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र मुंबई हायकोर्टाने रद्द केले आहे.  अमरावतीच्या जयंत वंजारी आणि राजीव मानकर यांनी नवनित कौर यांचे जात वैधता प्रमाणपत्र बनावट असल्याचा दावा करुन मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर न्या.बी.आर.गवई व न्या.रियाज छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. न्यायमूर्तींनी काल या प्रकरणी निकाल दिला. जी शाळा अस्तित्वातच नाही, ती शाळा सोडल्याचा दाखला कसा दिला जातो आणि या आधारावर तयार झालेले जात प्रमाणपत्र ग्राह्य धरता येणार नाही, असे स्पष्टीकरण हायकोर्टाने आपल्या निकालात केले आहे. आता नवनित कौर यांनी पंजाबच्या रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे, त्याबाबतही चौकशी करुन तीन महिन्यात अहवाल देऊन निर्णय घेण्याचे निर्देश हायकोर्टाने जात वैधता समितीला दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नवनित कौर-राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना जोरदार धक्का बसला आहे. गेल्यावेळी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवलेल्या नवनीत कौर राणा या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

COMMENTS