नांदेड – जिल्ह्याच्या विकासाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी कार्यरत असलेल्या जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निवडणुकीत राज्याच माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वााली 35 पैकी तब्बल 20 जागा जिंकून काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व स्थापित केले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात तळ ठोकून बसलेले भाजपाचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आ.सुजितसिंह ठाकूर व आ.प्रताप पाटील चिखलीकर यांना मतदारांनी धक्का दिला आहे.
जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत यापूर्वीच तब्बल 18 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित 17जागांसाठी 27 रोजी मतदान घेण्यात आले. त्याचा निकाल आज जाहीर झाला. या निकालातसुध्दा काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
काँग्रेसचे संजय बेळगे, राम नाईक, सुशीलाबाई बेटमोगरेकर, मंगाराणी अंबुलगेकर, अरुणा कल्याणे यांच्यासह 12 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर आजच्या निकालात 17 पैकी आठ जागांवर काँग्रेसने आपला ताबा मिळविल्याने काँग्रेसची जिल्हा नियोजन व विकास समितीत 20 संख्या झाली आहे. 35 पैकी तब्बल 20 जागांवर काँग्रेस उमेदवार विजयी झाल्यामुळे या समितीची काँग्रेसकडे एकहाती सत्ता आली आहे.
निवडणुकीच्या निकालावर दृष्टीक्षेप टाकला असता राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांचा वरचष्मा स्पष्ट दिसतो. जिल्हा परिषदेच्या 28 जागापैकी काँग्रेसने 16जगा जिंकल्या आहेत तर भाजपाला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले. प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासोबत फरफटत गेलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांच्या हाती केवळ भोपळा लागला आहे. तर शिवसेना 4, प्रदीप नाईक गटाचे राष्ट्रवादीचे 2 उमेदवार तर चिखलीकरांचा 1 उमेदवार या गटातून विजयी झाला आहे.
नगर पालिकेच्या चार जागांपैकी काँग्रेस व शिवसेनेने प्रत्येकी एक तर भाजपाने दोन जागा जिंकल्या आहेत. नगर पंचायतच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ही जागा आपल्या ताब्यात ठेवली आहे.तसेच महापालिकेच्या दोन पैकी दोन जागा काँग्रेस पक्षाने जिंकल्या आहेत.
निकालानंतरच्या आकडेवारीवर दृष्टीक्षेप टाकला असतांना काँग्रेस 20, भाजपा 7, राष्ट्रवादी काँग्रेस 2, शिवसेना 4 व प्रताप पाटील चिखलीकर गटास 2 जागा मिळाल्याचे लक्षात येते.
एकूणच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात तळ ठोकून बसलेले मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आ.सुजीतसिंह ठाकूर व शिवसेनेत राहून भाजपचा गाडा हाकणारे आ.प्रताप पाटील चिखलीकर यांना चांगली चपराक बसली आहे.
COMMENTS