नारायण राणेंचा भाजप प्रवेश तुर्तास तरी अशक्य ?

नारायण राणेंचा भाजप प्रवेश तुर्तास तरी अशक्य ?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची बरीच उलट सुलट चर्चा सुरू आहे. राणे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशीही शक्यता वर्तविली जात आहे. मात्र भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या तरी राणेंना भाजप प्रवेश दिला जाण्याची शक्यता नाही. राणेंना प्रवेश दिल्यास शिवसेना नाराज होण्याची शक्यता आहे. त्या मुद्द्यावरुन शिवसेनेने पाठिंबा काढून घेतल्यास सरकारची अडचण होऊ शकते.

सरकारला काहीही धोका नाही. अनेक अदृश्य हात सरकारला मदत करण्यास तयार आहेत असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यात काही प्रमाणात तथ्य़ असलं तरी शिवेसनेनं पाठिंबा काढून घेतल्यास कोणत्याही पक्षातला एवढा मोठा गट भाजपमध्ये येण्याची शक्यता नाही. विविध पक्षातले आमदार भाजपमध्य घेतल्यास त्यांना राजीनामा देऊनच पक्षात यावे लागेल. त्यामुळे तिथे पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यात  सगळीकडे यश येईलच अशी स्थिती नाही. त्याचा पक्षाच्या इमेजवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत मुख्यमंत्री ते धाडस करणार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दुसरी बाब म्हणजे भाजपातला एक गट राणेंना पक्षात प्रवेश द्यायला नाखूष असल्याची चर्चा आहे. पक्षात आल्यास राणे हे आपल्याला डोईजड होतील अशीही काहींना भीती आहे. राणे जिथे जातात तिथे फारसे रमत नाहीत असा गेल्या काही वर्षातला अनुभव आहे. त्यांना काँग्रेसमध्ये जाऊन जवळपास एक तप झाला असला तरी ते काँग्रेससोबत त्यांचे अनेकवेळा वाद झाले. ते काँग्रेसमध्ये फारसे रमले नाहीत. त्यातच त्यांचे आमदार पुत्र नितेश राणे यांनी वेळोवेळी हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोघात घेतलेली कट्टर भूमिकाही त्यांच्या प्रवेशाला अडसर ठरत असल्याची चर्चा आहे. या सर्व बाबींचा विचार करता राणेंचा भाजप प्रवेश होणार नाही अशीच शक्यता आहे.  अगदीच गरज पडल्यास लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना प्रवेश दिला जाऊ शकतो अशीही माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली आहे.

COMMENTS