सिंधुदुर्ग – आज कुडाळ येथे होणाऱ्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या भूमिपूजन होणार आहे. आता या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नारायण राणे हे व्यासपीठावर एकत्र येणार का ? याची चर्चा असतानाच राणेंच्या नावाने मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या स्वागताचे फलक झळकताना दिसत आहेत. मात्र या स्वागत फलकावर नारायण राणे यांच्या नावापुढे काँग्रेसचं नाव वगळण्यात आले आहे. स्वागत फलकावर, स्वागतोत्सक श्री. नारायण राणे, माजी मुंख्यमंत्री, आमदार विधान परिषद असा उल्लेख करण्यात आला आहे.
राणे भाजप प्रवेश करणार, आशा चर्चा सुरू असतानाच राणेंनी लावलेल्या या फलकाने त्याला आणखीच हवा मिळाली आहे. कुडाळमधील एस.टी. डेपो जवळ आज दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आदी दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत चौपदरीकरणाचा शुभारंभ होत आहे.
या भूमिपूजनाची उत्सुकता शिगेला पोचली आहे. याचे कारण शिवसेना भाजपच्या बॅनरबाजीच्या जोरदार शक्तिप्रदर्शनानंतर काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहेत.
संपूर्ण महामार्गावर हे फलक झळकत आहेत. भाजप-शिवसेना यांच्या श्रेयवादाच्या फलकांपेक्षाही राणेंनी लावलेल्या स्वागताचे फलक अधिक आहेत. त्यामुळे आजच्या भूमिपूजनाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. कारण प्रोटोकॉल नुसार जरी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असले तरी ऐनवेळी याचे भूमिपूजन नक्की कोण करणार ? उद्धव ठाकरे आणि राणे एकाच व्यासपीठावर येणार ? आलेच तर ते काय बोलणार ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
COMMENTS