शिवसेनेच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी आज (शुक्रवार) सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. शिवसेना आमदार या मंत्र्यांच्या तुलनेत भाजपच्या लोकप्रतिनिधींना जास्त निधी मिळतो असा आरोप शिवसेनेच्या मंत्र्यांनी केला होता. याच पाश्वभूमीवर आज सकाळी शिवसेनेचे आमदार तसेच पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, दादाजी भुसे, संजय राठोड यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना निधी वाटपाबाबत कोणावरही अन्याय करणार नाही’,’ यापुढे असं काहीही होणार नाही. असं सेनेच्या मंत्र्यांना आश्वासन दिल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेना-भाजपाच्या आमदारांना समान निधी वाटप केलं जाईल, असं म्हटलंय. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर पूर्ण विश्वास असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर गुरुवारी रात्री शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक घेतली होती. या बैठकीला पक्षाचे कॅबिनेट आणि राज्यमंत्री उपस्थित होते. सरकारला असलेला शिवसेनेचा पाठिंबा कायम राहील पण भाजपासमोर झुकण्याचे काहीही कारण नाही. आपल्या आमदारांची कामे झाली पाहिजेत, त्यांना जास्तीतजास्त निधी विकास कामांसाठी मिळाला पाहिजे यासाठी मुख्यमंत्री आणि भाजपाच्या इतर मंत्र्यांवर दबाव आणा, असे आदेश ठाकरे यांनी दिल्याचेही सूत्रांनी सांगितले होते.
COMMENTS