आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगावर चांगलीच टीका केली आहे. निवडणूक आयोग धृतराष्ट्र झाला असून सध्या त्यांच्याकडून दुर्योधनाला मदत करण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अरविंद केजरीवाल यांनी आपल्या निवास्थानी आयोजित पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर चांगलेच तोंडसुख घेतले. देशातील अनेक राज्यात मतदान यंत्रात बिघाड केल्याचा आरोप करण्यात येत आहे. धौलपूर पोटनिवडणुकीत १८ मतदान यंत्रात गडबडी झाली असून ईव्हीएम मशीनच्या प्रोग्रामींगचा कोड बदलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. हा कोड कोणी बदलला याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. आयोगाने यावर कोणतीही कारवाई न केल्याने त्यांच्या भूमिकेवर संशय येत असल्याचाही आरोप केजरीवाल यांनी केला.
राजस्थानमधील धौलपूरमधील ईव्हीएम मशिनमध्ये गोंधळ असल्याचे लक्षात आले होते. कोणत्याही पक्षासमोरील बटण दाबल्यास मत भाजपलाच जात होते. यावरुन केजरीवाल म्हणाले की, निवडणूक आयोग निवडणूक घेण्याचे नाटक का करत आहे. त्यापेक्षा सरळ भाजपचा विजय झाल्याचे जाहीर करावे. मग देशातील जनताच ठरवेल की कसे आंदोलन करायचे, असे त्यांनी सांगितले.
COMMENTS