पंतप्रधान मोदींची ट्विटरवरुन खिल्ली उडविल्याप्रकरणी एआयबीवर गुन्हा दाखल

पंतप्रधान मोदींची ट्विटरवरुन खिल्ली उडविल्याप्रकरणी एआयबीवर गुन्हा दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खिल्ली उडविल्याप्रकरणी ‘एआयबी’ अडचणीत सापडले आहे. ‘एआयबी’विरोधात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने गुन्हा दाखल केला आहे. ‘एआयबी’ने दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवणारे एक ट्विट केले होते. यात मोदी एका स्थानकावर थांबले असून ते मोबाईलमध्ये स्नॅपचॅटमधील डॉग फिल्टरचा वापर करत असल्याचे या छायाचित्रात दाखवण्यात आले होते. हे मीम अवघ्या काही तासांमध्येच व्हायरल झाले होते. मात्र यातून मोदींचा अपमान झाल्याची टीका सुरु झाली होती. शेवटी ‘एआयबी’ने हे ट्विट डिलीटही केले होते. मात्र काही नेटिझन्सही हा प्रकार मुंबई पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला.

मुंबई पोलिसांनीही यावर उत्तर दिले होते. ‘हा प्रकार लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहोत. पुढील कारवाईसाठी हे प्रकरण सायबर सेलकडे सोपवण्यात आले आहे’ असे मुंबई पोलिसांनी म्हटले होते. मुंबई पोलिसांनी शुक्रवारी याप्रकरणी ‘एआयबी’विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई पोलिसांच्या या कारवाईवरही अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुलीची तक्रार दाखल करुन घेण्यास विलंब करणारे पोलीस मोदींविरोधातील एका ट्विटवर कारवाई करण्यास तत्परता दाखवतात अशा शब्दात ट्विटर युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे.

COMMENTS