पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिल्या ‘गणेशोत्सवाच्या शुभेच्छा’

पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिल्या ‘गणेशोत्सवाच्या शुभेच्छा’

पुणे – महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणपती बाप्पाचे गुरूवारी आगमन होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास मराठी भाषेतून देशवासियांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुरूवारी एका कार्यक्रमादरम्यान मोदींनी मराठी भाषेतून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत महाराष्ट्रातील तमाम जनतेला खूश केले. आपल्या भाषणाचा समारोप करताना त्यांनी अचानकपणे मराठीत बोलायला सुरूवात केली. सुरूवातीला त्यांनी या कार्यक्रमातील पुरस्कार विजेत्यांचे मराठीतून अभिनंदन केले. त्यानंतर उद्यापासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवानिमित्त आपल्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा देतो, असे सांगत मोदींनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

पुण्याच्या भारतीय कृषी औद्योगिक प्रतिष्ठान संस्थेच्या स्थापना दिवस कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भाषण देत होते. या संस्थेचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात काल सायंकाळी पंतप्रधानांचे भाषण झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, साबरमती आश्रम निर्माण आणि चंपारण सत्यग्रहला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. तर सार्वजनिक गणेशोत्सवाला 125 वर्ष पूर्ण होतायत. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला या तिन्ही बाबींनी वेगळी दिशा दिली आहे. त्यामुळे इतिहासात या तिन्ही घटनांना अनन्यसाधारण महत्व आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि महादेव जानकर हेदेखील उपस्थित होते.

COMMENTS