‘पारदर्शक’ भाजपला ‘पारदर्शक’ मुंडे का नको झालेत ?

‘पारदर्शक’ भाजपला ‘पारदर्शक’ मुंडे का नको झालेत ?

पुणे – पीएमपीएलच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी त्यांच्या स्वभावानुसार धडाकेबाज कामाला सुरूवात केली आहे. पीएमपीएलची सुत्रे हाती घेताच त्यांनी कर्मचा-यांना वेळेवर कामावर हजर राहण्याचे आणि पूर्णवेळ काम करण्याचे फर्मान काढले. आणि कधी नव्हे ती कर्मचा-यांनामध्ये शिस्त यायला सुरूवात झाली. बंद पडलेल्या गाड्यांच्या बाबतीतही त्यांनी असेच निर्णय घेतले आणि त्यामुळे पुणेकरांना त्यांच्याबद्दल आपुलकी वाटू लागली. मुंडे काहीतरी चांगले काम करतील आणि पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारेल अशी आशा दररोज वाहतूक कोंडीत हतबल होत असलेल्या पुणे, पिंपरी चिंचवडकरांना वाटू लागली. मात्र मुंडे यांचे काम आता स्वतःला पारदर्शक समजणा-या भाजपच्या नेत्यांच्या पचनी पडत नाही. विविध कारणावरुन त्यांचे मुंडे यांच्याशी खटके उडत आहेत. त्यातूनच पुण्यातील भाजपच्या पहिल्या महापौर मुक्ता टिळक यांनी मुंडे यांना सरकारने परत बोलवावे अशी मागणीच थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. टिळक यांना स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आणि सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांचे पाठबळ आहे. तिकडे पिंपरीतही तीच परिस्थिती आहे. स्थायी समितीच्या सभापती सीमा सावळे यांच्यासह भाजपच्या अनेक नेते आणि नगरसेवकांना आता मुंडे नको झालेत.

खरंतर मुंडे हे त्यांच्या धडाकेबाज कामामुळे जिथे जातात तिथे सर्वसामान्य नागरिकांची वाहवा मिळवतात. कामाचा धडाका, भ्रष्चाराला थारा नाही. ना ते कोणाच्या दबावाला बळी पडतात ना ते कोणाच्या विरोधाला भीक घालतात. पीएमपीएलचे हित कशात आहे, पुणेकरांचे हित कशात आहे याचा विचार करुन ते काम करतात. म्हणूनच पुण्यातही सर्वसामान्य पुणेकरांना मुंडे हवे आहेत. पण सर्वसामान्यांचे कारभारी असलेल्या भाजपच्या पालिकेतल्या नेत्यांना ते नको आहेत.

तुकाराम मुंडे यांच्यावरही कांही गंभीर आक्षेप घेतले जात आहेत. ते नगरसवेकांना आणि महापौरांना किंवा इतर पदाधिका-यांना जुमानत नाहीत. त्यांना नीट वागणूक देत नाहीत. आक्षेपांमध्ये काही तथ्यही असू शकते. मुंडे यांनीही त्यामध्ये सुधारणा करायलाच हवी, लोकप्रतिनिधींना योग्य वागणूक द्यायलाच हवी. मात्र पालिकेल्या सत्ताधा-यांच्या सोईनुसार आणि त्यांच्या पारदर्शकतेच्या व्याख्येनुसार मुंडे यांनी काम करावे अशी जर भाजप नेत्यांची अपेक्षा असेल तर मात्र ती पूर्णपणे चुकीची आहे.

नवी मुंबई महापालिकेत तुकाराम मुंडे आयुक्त असताना ते खूप चांगले काम करत आहेत, आणि ते भ्रष्टाचाराविरोधात लढत आहेत आणि आपणही कसे भ्रष्टाचाराच्याविरोधात मुंडेच्या बरोबर आहोत हे सांगण्यासाठी नवी मुंबई आणि राज्य पातळीवरील भाजप नेत्यांची चढाओढ लागली होती. नवी मुंबईत त्यांनी धडाकेबाज काम केलंच आहे. त्यांना पुण्यात आणण्यासाठी भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांनीच पुढाकार घेतला मग तेच मुंडे पुण्यात आल्यावर त्यांचं पारदर्शक आणि धडाकेबाज काम भाजपच्या पारदर्शक नेत्यांना का पचणी पडत नाही असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत.

COMMENTS