पिंपरी महापालिकेत तुकाराम मुंढेंना आयुक्त करण्यासाठी जनमत चाचणी

पिंपरी महापालिकेत तुकाराम मुंढेंना आयुक्त करण्यासाठी जनमत चाचणी

कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त करावे, या मागणीसाठी भाजपचे शहर सरचिटणीस अमोल थोरात यांनी जनमत चाचणीला सुरुवात केली आहे. परंतु,  भाजपच्या महापालिकेतील पदाधिका-यांना याबाबत विचारले असता ते मौन बाळगणे पसंत केल आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांना नियुक्ती करण्याबाबत भाजपमध्ये राजकारण सुरू असल्याची चर्चा आहे.

 

पारदर्शक कारभार करण्याची हमी देत भाजपने पिंपरी-चिंचवड महापालिका काबीज केली. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांना बदलीचे वेध लागले आहेत. त्यांचा प्रशासनावर कसलाच वचक राहिला नाही. त्यामुळे अधिकारी कर्मचारी निर्ढावले आहेत. बदलीसाठी आयुक्तांच्या मुंबई-पुणे फे-या सुरू आहेत. पुढील एक ते दोन महिन्यात त्यांची बदली देखील होऊ शकते. त्यामुळे त्यांच्या जागी मुंढे यांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.

 

भाजपला पारदर्शी कारभार करायचा आहे. तर, मुंढे यांच्या नियुक्तीबाबत महापालिकेतील भाजपचे पदाधिकारी मौन का बाळगतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपचे पदाधिकारी ठरवणार तीच पारदर्शकतेची व्याख्या होणार का,  असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.  भाजपच्या महापालिकेतील पदाधिका-यांना आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे नको असल्याची चर्चा आहे. तर, भाजपच्या कार्यकर्त्यांना पारदर्शी कारभारासाठी मुंढे हवे आहेत. सरचिटणीस अमोल थोरात यांनी मुंढे यांची पिंपरी पालिका आयुक्त म्हणून नेमणूक करावी, यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देखील दिले आहे.

दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबईचे महापालिका आयुक्त असताना गैरकारभारांना लगाम घातला होता. अनधिकृत बांधकामे भुईसपाट केली होती. त्यामुळे मुंढे पिंपरी महापालिकेचे आयुक्त झाल्यावर पालिकेत कारभार करण्यास अडचण होईल, म्हणून भाजपचे पदाधिकारी त्यांच्या निवडीबाबत मौन बाळगत असल्याची चर्चा होत आहे.

COMMENTS