पिंपरी-चिंचवड – पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढी विरोधात आज पिंपरी-चिंचवडमध्ये शहर राष्ट्रवादी काँग्रेसने ‘श्राद्ध आंदोलन’ केले. यावेळी पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे श्राद्ध घालण्यात आले. सरकारच्या विरोधात तीव्र घोषणा देण्यात आल्या.
पेट्रोलच्या दरामध्ये दररोज वाढ होत आहे. सामान्य जनतेची लूट केली जात आहे. गेल्या 15 दिवसामध्ये तब्बल 18रुपयांनी पेट्रोल वाढले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये भरमसाठ दरवाढ झाली असून महागाई गगनाला भिडली आहे. भाजप सरकारचे हेच का ‘ते’ अच्छे दिन ? काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना एक रुपया दरवाढ झाली तरी, आंदोलन करणारे आज गेले कुठे ? असा सवाल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी येथे केला.
भाऊसाहेब भोईर म्हणाले की, अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून भाजपने सत्ता मिळविली. चार वर्ष भाजप सरकारला पूर्ण झाली तरी त्यांना सत्ता चालविता येत नाही. चार वर्षात महागाई गगनाला भिडली आहे. भाजपच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना त्यांचे राजीनामे घेणे गरजेचे आहे. मात्र, मुख्यमंत्री त्यांनी ‘क्लीन’ चीट देत सुटले आहेत, हे निषेधार्ह आहे.
COMMENTS