बैठक संपल्यावरही मुख्यमंत्री- शरद पवार यांच्यात तासभर गुफ्तगू !

बैठक संपल्यावरही मुख्यमंत्री- शरद पवार यांच्यात तासभर गुफ्तगू !

शरद पवार यांच्या 6 जनपथ निवासस्थानी शेतकरी कर्जमाफीवर आयोजित केलेली बैठक संपली. परंतू बैठक संपल्यावरही पाऊण तास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात गुफ्तगु झाली. या गुफ्तगुमध्ये नेमके काय झाले, हे अद्याप बाहेर आले नाही. मात्र, शेतकरी आंदोलनावरून भाजप सरकार अडचणीत आले असताना जाणारा राजा असलेल्या शरद पवार यांची मनधरणी करून कर्जमाफीचा मुद्दा तडीस लावण्यावर भाजप भर देत असल्याचे कळते. 

दरम्यान, राजकीय नेत्यांसोबत मॅराथाॅन बैठका घेऊन कर्जमाफीचा तोडगा काढण्यात येत असल्याचे वक्तव्य चंद्रकांत दादा पाटील यांनी केले आहे.

याबाबत माहिती देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी जाहीर केली आहे. या कर्जमाफीमुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना कसा लाभ मिळेल, याबाबत आम्ही मॅरेथॉन भेटी घेत आहोत. आज काँग्रेस खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेणार आहोत. विखे पाटील, धनंजय मुंडे, राजू शेट्टी यांच्याही भेटी घेतल्या. त्याप्रमाणे आज शरद पवारांची भेट घेतली.

आम्ही 30 जून 2016 पर्यंतचा थकित शेतकरी जो आहे, तो 83 टक्के आहे. त्याचं 1 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ करणार आहोत. त्यासाठी 25 हजार कोटी रुपये लागतील. या व्यतिरिक्त ज्यांनी नियमित कर्ज भरलं, त्यासाठी आम्ही वेगळं पॅकेज तयार करतोय. याबाबत आम्ही चर्चा केली. त्याबाबत पवार साहेबांनी काही सूचना मांडल्या. राज्याची आर्थिक स्थिती आणि अधिकाधिक शेतकऱ्यांचं समाधान याचा समन्वय साधण्यात मदत करण्याचं पवार साहेबांनी मान्य केलं.

आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्या राज्याने केली नाही, तेवढी कर्जमाफी महाराष्ट्रात होणार आहे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्याबाबत आज पुन्हा उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. ही तिसरी भेट आहे. याशिवाय अशोक चव्हाण यांचीही आजच भेट घेणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

 

 

COMMENTS