ठाणे – केडीएमसी महापालिकेचे भाजप नगरसेवक दया गायकवाड यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दया गायकवाड यांनी लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार एका 26 वर्षीय तरुणीने ठाणे पोलीस आयुक्तांकडे दाखल केली होती. याप्रकरणी दया गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दया गायकवाड यांनी फेसबुकवर मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचे तरुणीने तक्रारीमध्ये म्हटले होते. तसेच या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी अश्विनी धुमाळ आणि त्यांचे पती यांनी गायकवाडांना मदत केल्याचेही या तरुणीने तक्रारीमध्ये म्हटले होते. या प्रकरणी वर्तक नगर पोलिसांनी नगरसेवक दया गायकवाडांसह त्यांना मदत करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी धुमाळ आणि त्यांच्या पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पीडित तरुणीने ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना लेखी तक्रार अर्ज देऊन न्याय मिळावा, यासाठी मागणी केली होती. तसेच पीडित तरुणीला खंडणीच्या खोट्या आरोपात अडकवण्याचा प्रयत्न संबंधित नगरसेवक आणि त्यांचे दोन सहकारी करत होते. या तरुणीने कल्याणच्या खडक पाडा पोलीस ठाण्यातील पोलीस वारंवार दमदाटी करत असल्याचेही सांगितले. यानंतर मात्र, तरुणीने पोलीस आयुक्तांना भेटून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई न झाल्यास आयुक्तालयाच्यासमोर उपोषण करण्याचा इशाराही तिने दिला आहे.
COMMENTS