युपीए सरकारच्या काळात मंजुर झालेल्या आणि इमारती बांधून पुर्ण झाल्यानंतर बासनात गेलेल्या योजनेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. बंद पडलेल्या योजनेतील रिकामी इमारत सत्तेचा गैरवापर करत अत्यंत कमी दरात ताब्यात घेऊन तिथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी खाजगी शाळा सुरु केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
भोकरदन शहराला लागूनच असलेल्या जोमाळा शिवारातील पावणेचार हजार स्क्वेअर फुट जागेवरील दोन मजली इमारतीत सध्या “मराठवाडा रेसिडेंन्शियल स्कूल’ सुरु आहे. रावसाहेब दानवे यांच्या जालना येथील महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांना पदाचा गैरवापर करत मान्यता दिल्याचे प्रकरण ताजे असतांनाच या नव्या वादामुळे रावसाहेब दानवे अडचणीत आले आहेत.
केंद्रातील युपीए सरकारने देशात शंभर मॉडेल स्कूल सुरु करण्यास मंजुरी दिली होती. शाळेच्या इमारत बांधकामासाठी निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला होता. या अतंर्गत रावसाहेब दानवे खासदार असलेल्या जालना लोकसभा मतदारसंघातील भोकरदनमध्ये एक मॉडेल स्कूल मंजुर करण्यात आले होते. शहराला लागूनच असलेल्या जोमाळा शिवारात या स्कूलच्या इमारतीचे बांधकाम सुरु असतांनाच केंद्रात सत्तांतर झाले आणि ही योजना बारगळली. तोपर्यंत इमारतीचे निम्मे काम झाले होते. केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर या अर्धवट इमारतीचे बांधकाम पुर्ण करण्यात आले. पैकी भोकरदन येथील मॉडेल स्कूलची इमारत रावसाहेब दानवे सचिव असलेल्या मोरेश्वर शिक्षण संस्थेला नाममात्र दरात वापरण्यासाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. रावसाहेब दानवे मोरेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव. दानवेंना संस्थेचा इमारतीचा ताबा मिळताच मराठवाडा रेसिडेंशीअल स्कूल भोकरदन या नावाने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु केली. सध्या शाळेत 315 मुलं शिकत आहेत.
2003 मधील शासकीय निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या इमारती खाजगी संस्थांना देण बेकादेशीर नसलं, तरी दानवेंना इमारत देताना अनेक अटी डावलण्यात आल्याचं स्पष्ट दिसत आहे. दानवेंना शाळा इमारत देताना जिल्हा परिषदेचा ठराव का घेतला नाही. शिक्षण विभागाचा विरोध शिक्षणमंत्र्यांनी का डावलला आणि बाजार भावाने दानवेंच्या संस्थेला भाडं का आकारलं नाही असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
COMMENTS