कल्याण – भाजपला या देशातील सत्ता हवी आहे आणि ती मिळवण्यासाठी हा पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतो अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली. कल्याणजवळील वरप गावात राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हा ग्रामीण विभागातर्फे आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी मंत्री गणेश नाईक, उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, माजी खासदार आनंद परांजपे, संजीव नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पवार यांनी भाजपच्या अच्छे दिन, नोटबंदी, गोहत्या, शेतकरी कर्जमाफी आदी प्रमुख मुद्द्यांवर चौफेर तोफ डागली. आज देश वेगळ्या परिस्थितीतून जात आहे. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांचा सर्वांना एकत्रित घेऊन जाण्याचा दृष्टिकोन नाहीये. कधी अल्पसंख्यांक, कधी दलितवर्ग तर कधी महिला वर्गाबद्दल सत्ताधाऱ्यांकडून अपशब्द वापरले जात आहेत. या परिस्थितीत लोकांची बांधिलकी असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मोठी जबाबदारी आल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.
उत्तर प्रदेशमध्ये सत्ता आल्यानंतर सामाजिक ऐक्य ठेवण्याची खबरदारी न घेतल्यास उत्तरप्रदेशसह संपूर्ण देशावर त्याचे परिणाम होण्याची भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तर देशाची सत्ता मिळवण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो. केंद्रात असणाऱ्या सत्तेच्या बळावरच गोवा, मणीपूरसारख्या ठिकाणी बहुमत नसतानाही आपली सत्ता प्रस्थापित केली. ही गोष्ट देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय घातक असून संसदीय लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र राहावे लागेल असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग काढायचे मुख्यमंत्र्यांनी ठरवले असून त्यातून नेमकी कोणाची समृध्दी होणार आहे असा प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला न मिळाल्यास हा रस्ता होऊ दिला जाणार नाही असा इशाराही शरद पवार यांनी यावेळी दिला.
COMMENTS