भारतातील सर्वात लांब महामार्ग बोगद्याचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

भारतातील सर्वात लांब महामार्ग बोगद्याचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

उधमपूर – भारतातील सर्वात मोठ्या बोगद्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. जम्मू काश्मीरमधील नशरी ते चेनानी असा हा बोगदा तयार करण्यात आला आहे. एनएच ४४ या राष्ट्रीय महामार्गावर तयार करण्यात आलेल्या चेनानी ते नाशरी दरम्यानच्या या बोगद्याचे अंतर ९ किलोमीटर इतके आहे. तब्बल ९ किलोमीटर लांबीच्या या बोगद्यामुळे आता प्रवासातील वेळ २ तासांनी कमी होणार आहे.

या बोगद्यामुळे जम्मू आणि श्रीनगर एकमेकांशी जोडले गेले आहेत. या बोगद्यामुळे दोन शहरांमधील अंतर दोन तासांनी कमी होणार आहे. तर ३१ किमी मार्गाचा प्रवास कमी होणार आहे.

या बोगद्याच्या लोकार्पण सोहळ्यानंतर बोगद्यात काही अंतरापर्यंत जाऊन मोदींनी पाहणीदेखील केली आहे. या बोगद्यामुळे आता १२ महिने श्रीनगरचा देशाबरोबर संपर्क राहील हवामानामुळे कधीही देशाशी संपर्क तुटणार नाही. या बोगद्यात जागतिक दर्जाची सुरक्षा यंत्रणा बसविण्यात आली असून त्यातून जम्मू-काश्मिरमधील व्यापाराला आणि पर्यटनाला बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

जम्मू श्रीनगर या २८६ कि.मी. अंतराच्या ४ लेन महामार्गावर या बोगद्याचे प्रत्यक्ष अंतर ९.२ किलोमीटर्सचे आहे. अर्धवर्तुळाकार मुख्य बोगद्याची लांबी ९.२० कि.मी. व रूंदी ९.३५ मीटर्स आहे. यासोबतच दोन्ही बाजूला १.३० मीटर्सचे पादचारी मार्ग आहेत. बंद पडलेल्या वाहनांमुळे बोगद्यात वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी याच बोगद्याला जोडून समांतर रेषेत दुसरा एक बोगदाही तयार करण्यात आला आहे.

आशिया खंडातील या सर्वात मोठया बोगद्याची वैशिष्ठये

सुरक्षा व्यवस्था

देशातील सर्वात मोठ्या बोगद्यात सुरक्षेवरही भर देण्यात आला आहे. या बोगद्यातील सुरक्षा व्यवस्था अत्याधुनिक आहे. बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ ३६० अंशात बघता येतील असे कॅमेरे लावण्यात आले आहेत.या बोगद्याच्या दर ३०० मीटर अंतरावर बाहेर निघण्यासाठी छोटे समांतर बोगदे बांधण्यात आले आहेत.

वृक्षाची कत्तल नाही

भारतातील सर्वात मोठा बोगदा तयार करताना हिमालयमधील एकाही वृक्षाची तोड करावी लागलेली नाहीये. स्थानिकांना विशेष प्रशिक्षण देऊन या बोगद्याचे काम करण्यात आले.

२५०० कोटी खर्च

या प्रकल्पासाठी सुमारे २५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च झाला

आपातकालीन परिस्थिती मिळणार माहिती

सुमारे १० किलोमीटर लांब बोगद्यात एफएमवर गाणी ऐकता येणार आहेत. एका विशिष्ट फ्रिक्वेंन्सीवरच ही गाणी ऐकता येतील. या फ्रिक्वेन्सीचा फायदा म्हणजे आपातकालीन परिस्थितीत या एफएमवर माहिती देणे शक्य होईल. तसेच मोबाईल आणि इंटरनेट सेवाही या बोगद्यात सुरु राहणार आहे.

या बोगद्याच्या एकात्मिक वाहतूक नियंत्रण व्यवस्था, टेहळणी व्यवस्था, हवा खेळती राहण्यासाठीची सुविधा, अग्निशमन व्यवस्था आणि आपत्तकालीन परिस्थितीमध्ये मदत मिळविण्यासाठीची यंत्रणा दर १५० मीटरवर उभारण्यात आली आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

बोगद्यात १२४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. याशिवाय गाड्यांची संख्या मोजण्यासाठीही ट्रॅफिक काऊंटीग कॅमेरा लावण्यात आला आहे.

COMMENTS