मतदानयंत्राबाबत निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाची नोटीस

मतदानयंत्राबाबत निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाची नोटीस

नवी दिल्ली – नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मतदान यंत्रामध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार झाल्याचे आरोप झाले. बहुतेक सर्वच पक्षांनी आणि उमेदवारांनी भाजपवर यंत्रामध्ये फेरफार केल्याचा आरोप केला. त्या पार्श्वभूमीवर संगणक तज्ज्ञांमार्फत याची चौकश करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने निवडणुक आयोगाला नोटीस बजावली आहे.

निवडणुकीत वापरलेल्या मतदान यंत्रात फेरफार करता येतात व तसे ते करण्यात आले असावेत, असा आरोप करणारी जनहित याचिका एम. एल. शर्मा यांनी दाखल केली होती. त्यात न्यायालयाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांतील फेरफाराबाबत केंद्राला प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यास सांगावे व त्याबाबतचा चौकशी अहवाल सर्वोच्च न्यायालयास सादर करण्याचा आदेश द्यावा असे म्हटले होते. राजकीय पक्षाने स्वत:च्या हितासाठी मतदान यंत्रात फेरफार केल्याचा आरोप त्यात केला आहे. विश्वासार्ह सॉफ्टवेअर, इलेक्ट्रॉनिक तज्ज्ञ, वैज्ञानिक यांच्यामार्फत मतदान यंत्रांचा दर्जा, सॉफ्टवेअरची सुरक्षितता,  हॅकिंगचा परिणाम याबाबत मतदान यंत्रांची तपासणी करण्यात यावी व त्याचा अहवाल पुढील कारवाईसाठी न्यायालयास सादर करण्यास सांगावे अशी मागणी याचिकेत केली आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका व महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रांत फेरफार करण्यात आल्याचा आरोप याचिकादाराने केला आहे.

COMMENTS