मध्यप्रदेशातील सिहोरमध्ये शेतकरी आंदोलनात एका 80 वर्षांच्या वृद्धेचा पोलिसांच्या मारहाणीत हात मोडल्याची घटना घडली आहे. कमलाबाई असे या महिलेचे नाव असून त्यांच्या 83 वर्षांच्या पतीलाही पोलिसांनी मारहाण केली आहे.
मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांचे शुक्रवारी आंदोलन सुरू होते. आमच्या घराजवळ असलेल्या वऱ्हांड्यात काही आंदोलक आले आणि पळून गेले. काही पोलीस या ठिकाणी त्यानंतर आले त्यांनी काहीही विचारपूस न करता थेट मला मारहाण करण्यास सुरूवात केली. या आंदोलनाशी माझा काहीही संबंध नाही. तरीही मला मारहाण करण्यात आली. मी माझ्या घरामध्ये, माझे पती आणि नातवांसोबत बसले होते. तेव्हा पोलिसांनी अचानक तिथे प्रवेश केला. दगडफेक करणाऱ्या आंदोलकांना तुम्ही तुमच्या घरात लपण्यास जागा दिली आहे असा आरोप पोलिसांनी केला. तुम्ही घरात जाऊन बघू शकता, मी कोणालाही लपण्यासाठी आश्रय दिलेला नाही असेही आपण त्यांना सांगितल्याचे कमलाबाईंनी म्हटले आहे. मात्र पोलिसांनी काहीही ऐकून न घेता मला आणि माझ्या पतीला मारहाण करायला सुरूवात केली, असे कमलाबाई यांनी सांगितले आहे.
पोलिसांच्या या मुजोरीची जबाबदारी मध्यप्रदेश सरकार घेणार का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. मला ज्या पोलिसांनी मारहाण केली ते माझ्या नातवांच्या वयाचे आहेत. त्यांना भेटून विचारायचे प्रश्न करायचा आहे की, मला मारहाण नेमकी का करण्यात आली? असेही कमलाबाई यांनी म्हटले आहे
COMMENTS