मुंबई, 7 ऑगस्ट – सकल मराठा समाजाचा राज्यव्यापी मोर्चा दि. ९ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी ११.०० वाजता मुंबईमध्ये धडकणार आहे. मुंबईच्या इतिहासातील हा सर्वात मोठा मोर्चा असेल, या ऐतिहासिक मोर्चाची तयारी आता पुर्ण होत आली असून या मोर्चासाठी मुंबईची टीम सज्ज झाली आहे.
साडेतीनशे वर्षानंतर पुन्हा एकदा मराठा समाज एकवटला असून राज्यभरातील विविध जिल्ह्यातील ५७ मुक मोर्चे करुन ५८ व्या मोर्चासाठी मराठा समाज ९ ऑगस्ट रोजी मुंबईत दाखल होणार आहे. आपल्या जिव्हाळ्याच्या व प्रलंबित मागण्यांसाठी मराठा समाजाचे वादळ मुंबईत दाखल होत असताना मोर्चाची शिस्त व आचारसंहिता ही आधीच्या मोर्चांसारखीच राहणार आहे.
सकाळी ११.०० वाजता भायखळा येथील वीरमाता जिजामाता उद्यान येथे जिजाऊ वंदना करुन मोर्चाची सुरुवात होणार आहे. हा मोर्चा कै.आण्णासाहेब पाटील पुल, खडापारसी , इस्माईल मर्चंट चौक, जे.जे.फ्लायओव्हर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स ओलांडून आझाद मैदान येथे येईल. ५७ मोर्चांची शांततामय परंपरा राखत हा मोर्चा देखील मुक स्वरुपाचा असेल.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्य़ातून येणाऱ्या मराठा समाजाच्या बांधवांसाठी सर्व ठिकाणी विशेष सोय करण्यात आली आहे. कामोठे, खांदेश्वर, खारघर, जुईनगर, वाशी, नवी मुंबई येथे तसेच ठाणे, मुंलुड, भांडूप, चेबूंर येथे पाण्याची व फिरत्या शौचालयाची सोय करण्यात आली आहे. सर्व वाहनाच्या पार्किंगची सोय बीपीटी, सिमेंट यार्ड, रे रोड येथे करण्यात आली आहे. या पार्किंगची व्यवस्था पाहण्यासाठी विशेष समिती गठन करण्यात आली आहे. लोकांच्या मार्गदर्शनासाठी जागोजागी सुचना फलक लावण्यात आले आहेत.
या मोर्चाच्या परवानग्यासाठी मुंबई पोलिस, मुंबई महानगरपालिका , फायर ब्रिगेड यांच्याकडे अर्ज करण्यात आले आहेत. बहुतांशी परवानग्या उपलब्ध झाल्या आहेत.
मोर्चामध्ये मुंबई व जवळील जिल्ह्यातील सहा हजार स्वयंसेवकांची नोंदणी पुर्ण झाली आहे. या स्वयंसेवकांचे प्रशिक्षण पुर्ण झाली आहे. स्वयंसेवकांची ही संख्या वाढतच आहे. मुंबईतील समाज बांधवांनी या मोर्चासाठी स्वयंसेवकांच्या भूमिकेत रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
या ऐतिहासिक मोर्चाला मुंबईतील विविध स्तरातील मराठा समाज एकवटत आहे, सामाजिक संस्था, गणेशोत्सव व दहीहंडी मंडळे तसेच मुंबईचे डब्बेवाले, रेल मराठाचे स्वयंसेवक , मराठा मेडिको असोशिएशन तसेच अनेक सामाजिक व राजकीय व्यक्ती उत्स्फुर्तपणे हा मोर्चा यशस्वी होण्यासाठी सहकार्य करत आहेत. सर्वांच्या सहकार्याने हा मोर्चा विक्रमी ठरेल यामध्ये आयोजक म्हणून आमच्या मनात कोणतीही शंका नाही. तमाम मराठा बांधवांनी या ऐतिहासिक मोर्चात मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
या पत्रकार परिषदेस सकल मराठा मुक क्रांती मोर्चाचे मुंबईचे संयोजक विरेंद्र पवार, इंद्रजीत निंबाळकर, दिलिप जगताप, विनोद पोकरकर, अॅड. संतोष सुर्यराव , श्रीकांत पाटील आदी संयोजक उपस्थित होते.
या पत्रकार परिषेदनंतर मोर्चा आणि मागण्यासंदर्भात राज्य समन्वयक समितीच्या सदस्यांनी माहिती दिली.
COMMENTS