“महाराष्ट्र मिशन, 1 मिलीयन” मध्ये मुंबईचे डबेवालेही खेळले फुटबॉल

“महाराष्ट्र मिशन, 1 मिलीयन” मध्ये मुंबईचे डबेवालेही खेळले फुटबॉल

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी “महाराष्ट्र मिशन, वन मिलीयन” ची घोषणा केली. त्याला प्रतिसाद म्हणून मुंबई जिमखान्यात मुख्यमंत्र्यांसह डबेवाल्यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिफा अंडर १७ विश्वचषक स्पर्धेनिमित्ताने देशात १ कोटी १० लाख लोकांनी फुटबॉल खेळावा, अशी कल्पना मांडली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारच्या क्रीडा विभागाने “महाराष्ट्र मिशन, वन-मिलीयन”ची घोषणा केली आहे.
मुलांमध्ये ऑनलाईन राहाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांना एक प्रकारे या गेम्सचे व्यसन जडत असल्याचे दिसून येत आहे. नेटचॅटींग, सोशलमीडिया, स्वस्त व सहज उपलब्ध गेम, पॉर्न साइट्सच्या आकर्षणामुळे हे प्रमाण वाढतच आहे. मुले ऑनलाईनच्या व्यसनात अडकत चालली आहेत. त्यामुळे ही मुले अभ्यासावर लक्ष केंद्रीत करू शकत नाहीत. त्यांचा स्वभाव चिडचिडा होतो. ती एकलकोंडी होतात. कधी कधी तर गेम्सच्या अती आहारी जाऊन आत्महत्या करतात. या करता मैदानी खेळाचे महत्व पटवून देण्यासाठी डबेवाले या उपक्रमात सहभागी झाले होते.

या पिढीला जर वाचवायचे असेल तर यांना पुन्हा मैदानी खेळ करण्यासाठी भाग पाडले पाहिजे. मैदानी खेळामुळे प्रकृती उत्तम राहाते. मन शुद्ध राहाते. सहकाऱ्यांबरोबर खेळल्यामुळे विजय व पराभव काय असतो ते कळते. यश-अपयश याला कसे सामोरे जायचे ते कळते. यामुळे मुले एकलकोंडी होणार नाहीत आणि विशेष म्हणजे ऑनलाईनच्या विळख्यातून ती बाहेर येतील. त्यामुळे मुलांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत मुंबई डबेवाला असोशिएशन प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी व्यक्त केले.

 

COMMENTS