‘मातोश्री’वरील बैठकीत नेमकं घडलं काय?

‘मातोश्री’वरील बैठकीत नेमकं घडलं काय?

शिवसेना मंत्री आणि आमदारांची यांची आज (गुरुवार) मातोश्रीवर बैठक पार पडली. यावेळी नेमकं काय घडलं बैठकीत…

 

पक्षाचे सर्व मंत्री आणि आमदार मातोश्रीवर दाखल झाले…. उद्धव ठाकरे यांनी सर्व मंत्र्यांना आतल्या खोलीत बसवले…. सर्व आमदारांना बाहेरील खोलीत बसवले.

 

प्रथम उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांसोबत चर्चा केली. मंत्र्यांसोबत चर्चा करताना उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांना झापले. आमदारांची कामे होत नाहीत किंवा इतर ज्या काही गोष्टी चालू आहेत त्या मला माहिती आहेत. त्यामुळे व्यवस्थित काम करा असा सज्जड दम उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांना दिल्याची  माहिती  सूत्रांकडून मिळतेय.

 

मंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरे बाहेरील खोलीत येऊन आमदारांसोबत बोलले. तुम्ही आमदारांनी आज दुपारी विधान भवनात एक बैठक घेतली. तुम्हाला काय म्हणायचे आहे मला माहिती आहे. सगळेच आमदार मंत्री होऊ शकत नाहीत. काही लोकांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रारी असू शकतात किंवा त्या आहेत हे मला माहिती आहे. मी कुणाच्याही दबावाखाली (मीडिया) कोणताही निर्णय घेणार नाही. पक्षाचा विचार करून योग्य वेळी योग्य निर्णय घेईन. तुमच्या सगळया मागण्या मला माहिती आहेत. पण हा निर्णय घेण्याची तीही वेळ नाही.

 

आता तुम्हाला मंत्र्यांसोबत समोरासमोर चर्चा करायची आहे का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी आमदारांना विचारला. त्यावर आमदार म्हणाले, “साहेब आता तुम्हाला सर्व माहिती आहे. तुम्ही योग्य निर्णय घेणार आहात तर मंत्र्यांसोबत समोरासमोर चर्चा करण्याची गरज नाही. आम्ही आता मंत्र्यांसमोर कशासाठी बसू? ”

 

शेवटी बैठकीचा शेवट गोड व्हावा यासाठी काही आमदारांनी मंत्र्यांना बाहेर बोलवा असे सांगितले. मंत्री बाहेर आले आणि बैठक संपली…

 

 

COMMENTS